रांजणगाव येथील बैठकीतत ग्रामपंचायत, असोसिएशनची माहिती रांजणगाव गणपती – पुणे- नगर महामार्गावरील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध प्रकारचे उपाययोजना करण्यात येणार आहेत. कंपन्या सुटण्याच्या दरम्यान कारेगाव, रांजणगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने व रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने वाहतूक पोलिसांना मदतनीस उपलब्ध करून देण्यात येतील, असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी सकारात्मक चर्चा करून उपाययोजना करण्याचे ठरले. यावेळी कारेगावच्या सरपंच वृषाली गवारे, रांजणगाव गणपतीचे उपसरपंच श्रीकांत पाटील पाचुंदकर, यशवंत पाचंगे, ॲड. तुषार कर्डीले, संदीप गवारे, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे विक्रम सिंग, एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता अशोक मगर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नाझिर नायकवाडी, गौतम पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वाहन कोंडी टाळण्यासाठी अनेक कंपन्यांनी कामाच्या शिफ्टच्या वेळेत बदल केले असल्याचे रांजणगाव इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कंपन्यांचा माल ने-आण करणाऱ्या वाहनांना औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळ उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. रांजणगाव येथील बस स्टँडच्या समोरील एमआयडीसीकडे जाणारा बस थांबा गावातील पेट्रोलपंपाच्या समोर करावा, अशी सूचना यावेळी मांडण्यात आली. कंपन्यांच्या कामगारांनी घरातील कचरा रस्त्याच्या कडेला न टाकता तो कचरा कचराकुंडी टाकावा, असे आवाहन रांजणगावचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर यांनी यावेळी केले. नगर महामार्गावरील बहुप्रतिक्षित अशा तीन मजली रस्त्याचे काम वर्षभरात चालू होणार असल्याचे सूतोवाच यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मंदिराजवळील तीव्र उतार काढा पुणे नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्यांची कामे करण्यात येणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले. अतिक्रमण काढल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. खंडाळा माथा, सणसवाडी येथील मजूर अड्डा, रांजणगावच्या महागणपती मंदिराजवळील दोन्ही बाजूचे तीव्र उतार व फलके मळा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आलेले गतिरोधक काढण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली. ग्रामस्थांच्या व कंपनी पदाधिकाऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.