पुणे जिल्हा : टोकावडे, शिरगाव सजा दोन वर्षांपासून बंदच

खेडच्या महसूल प्रशासनाची पोलखोल : ग्रामस्थ आक्रमक
राजगुरूनगर – खेड तालुक्याच्या आदिवासी भागात टोकावडे आणि शिरगाव सजा कार्यालय गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने महसूल प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाली आहे.
शिरगाव सजा कार्यालयात तलाठी कार्यालयाला कुलूप नाही व त्यामध्ये वार्यावर खराब झालेल्या महत्त्वाच्या कागदपत्राचा व्हिडीओ धुवोली गावाचे उपसरपंच शरद जठार, शिरगावचे अंकुश शिर्के यांनी काढून सोशल मीडियावर रविवारी (दि 30) पाठवला होता. कार्यालयातील कपाटात अनेक नागरिकांचे मतदान कार्ड ठेवण्यात आले होते ते वाटप करण्यात आले नव्हते. तलाठी कार्यालयाचे हे वास्तव जनतेसमोर व्हिडीओद्वारे समोर येताच या सजा अंतर्गत येणार्या नागरिकांनी एकत्र येऊन नवीन तलाठी कोतवाल यांची मागणी करीत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
शिरगाव आणि टोकावडे या दोन्ही सजा अंतर्गत भीमाशंकर, भोरगिरी, टोकावडे, भोमाळे, खालचे वरचे, पाभे, भिवेगाव, कारकुंडी, शिरगाव मंदोशी, मोरोशी, धामणगाव खुर्द, धुवोली, वांजळे, शेंदुर्ली ही गावे येतात. त्यांना वाडा सर्कल आहे. श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग भीमाशंकर या सजामध्ये येते मात्र या गावाचे तलाठी राजगुरूनगरमधून काम करीत होते. श्री भीमाशंकर देवस्थानचे सचिव खेडचे तहसीलदार आहेत. असे असताना तलाठी कोतवाल मात्र गैरहजर असल्याने भाविकांच्या समस्या सोडवल्या जात नव्हत्या. तब्बल 16 गावे आणि त्यांच्या वाड्या वस्त्यांमधील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. शिरगाव सजा कार्यालयातील पोलखोल झाल्यानंतर याभागातील शेतकरी, नागरिक नवीन तलाठी, कोतवाल यांच्या मागणीसाठी आक्रमक झाला.
16 गावांतील प्रमुख धडकले
मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे घेण्यासाठी राजगुरूनगर येथे तलाठी यांच्याकडे यावे लागत आहे. वेळेत कागदपत्र मिळत नसल्याने वेळ पैसा आदिवासी भागातील गरीब जनतेच्या वाया जातो. शिवाय मनस्ताप होतो हे सर्व टाळण्यासाठी शिरगाव, टोकवडे सजाला नवीन तलाठी द्यावा, अशी मागणी या दोन्ही सजामधील 16 गावांतील प्रमुख ग्रामस्थ मंगळवारी (दि. 2) निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी स्वीकारले.
राजगुरूनगरातच सुरू केले तलाठी कार्यालय
शिरगाव टोकावडे सजाचे तलाठी हे राजगरूनगर येथे राहतात तेथेच त्यांनी तलाठी कार्यालय सुरू केले आहे. या गावांतील नागरिकांना लागणारे आवश्यक कागदपत्र सर्व राजगुरूनगर येथे सबंधित तलाठ्यांनी नेले आहे, त्यामुळे शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, विधवा ज्येष्ठ नागरिक यांना त्यांना लागणारे आवश्यक कागदपत्र दाखले घेण्यासाठी राजगुरूनगर येथे यावे लागत आहे. नागरिकांचा वेळ पैसा खर्च होत होता. टोकावडे,शिरगाव सजाचे कार्यालय असताना तलाठी कोतवाल या ठिकाणी उपस्थित राहत नव्हते. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
शिरगाव सजासाठी राजेंद्र मोरे यांची तलाठी म्हणून नेमणूक केली आहेटोकावडे सजासाठी नवीन तलाठी तत्काळ दिला जाईल नागरिकांची अडचण सोडविली जाईल. कोणतीही अडचण आल्यास महसूल विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क करा. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये.
– मदन जोगदंड, नायब तहसीलदार





