Pune District : उत्तम आरोग्यासाठी लोणी मॅरेथॉन स्पर्धेत धावले साडे तीन हजार स्पर्धक

लोणीधामणी : लोणी (ता.आंबेगाव) या ठिकाणी पुनीत बालन ग्रुप , फ्री रनर्स ग्रुप ,माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. ३ किमी,५ किमी, १० किमी आणि २१ किमी, अशा चार प्रकारात ही स्पर्धा पार पडली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पार पडलेली ही भव्य दिव्य स्पर्धा जिल्ह्यात पहिली असून स्पर्धेसाठी साडेतीन हजार स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे इथिओपिया या देशातील दोन स्पर्धक स्पर्धे करता सहभागी झाले होते. राजस्थान, हरियाणा,उत्तर प्रदेश या राज्यातील देखील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते. पुनीत बालन ग्रुप पुणे, फ्री रनर्स पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी,लोणी हे या स्पर्धेचे प्रायोजक होते. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट, मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांसाठी राहण्याची व्यवस्था शाळेमध्ये माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीने केली होती. माणिकचंद ऑक्झरीच यांच्या वतीने सर्व स्पर्धकांना मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
२१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी करण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने इतर स्पर्धेतील स्पर्धकांना सोडण्यात आले. लहान मुलांपासून ९० वर्षाच्या वयो वृद्धापर्यंतच्या सर्व गटातील लोकांनी आकर्षक वेशभूषा करूनही सहभाग नोंदवला. स्पर्धकांचा तणाव हलका करण्यासाठी झुंबा नृत्याच्या माध्यमातून व्यायाम प्रकार करून घेण्यात आले. यावेळी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी मालिका अभिनेते हार्दिक जोशी हे देखील आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी त्यांच्या गाजलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील संवादही त्यांनी प्रेक्षकांना म्हणून दाखवला. बक्षीस वितरणासाठी आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील उपस्थित होते.
त्यांच्यासमवेत गुजरात भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल ब्रह्मभट आणि पुणे जिल्हा भाजपचे ज्येष्ठ नेते ताराचंद कराळे हे देखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमासाठी निरंकार आर्ट्स पुणे, जनकल्याण पतसंस्था लोणी आणि आदित्य कन्स्ट्रक्शन पुणे यांच्यासह काही मान्यवरांनी अर्थसाह्य केले. स्पर्धेचे मुख्य स्पर्धा संयोजक राजेश वाळुंज यांनी नियोजनाची धुरा सांभाळली. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज,खजिनदार बाळासाहेब गायकवाड तसेच मंत्रालयातील सहसचिव कैलास गायकवाड, सरपंच सावळाभाऊ नाईक, राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी किसन गायकवाड, मयूर लोखंडे, नवनीत सिनलकर, पांडुरंग वाळुंज, संतोष पडवळ, अविनाश वाळुंज, प्रकाश वाळुंज हे प्रबोधिनीचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रप्रेमी युवक मंडळ लोणी तसेच लोणी गावातील विविध युवक मंडळांनी पूर्ण सहकार्य केले. अरुण साकोरे आणि पडवळ अकॅडमी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेसाठी विविध तालुक्यातील जवळपास 50 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला. धामणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बिरारी, लोणी गावातील डॉ. चंद्रकांत देशमुख, डॉ. रसिक काळे, डॉ.भास्कर भोसले, डॉ. संजय सिनलकर यांनी वैद्यकीय विभागाची जबाबदारी सांभाळली.
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले,” ही मॅरेथॉन स्पर्धा लोणी गावाच्या लौकिकात आणि वैभवात भर घालणारी असून या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. यावेळी लोणी गावचे सरपंच सावळेराम नाईक,शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, पुनीत बालन ग्रुपचे सदस्य चेतन लोखंडे,जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाळुंज पाटील, उपसरपंच स्वाती वाळुंज, माजी सरपंच उद्धव लंके,दिलीप वाळुंज, माजी उपसरपंच प्रकाश गायकवाड आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. डॉ. अविनाश वाळुंज आणि ऋतुजा इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.





