पुणे जिल्हा : उनाडक्या करणाऱ्यांना चाप लावणार

शिक्रापूर पोलिसांचा कारवाईचा इशारा
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे परिसरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यायाच्या आवारात मोकाट फिरणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या गाड्या जप्त करून पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किशोर तेलंग यांनी इशारा दिला आहे.
तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा परिषद शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयामध्ये आजूबाजूच्या गावातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी तळेगाव ढमढेरे येथे येत असतात.
शाळाबाह्य मुलांच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली असल्याने काही तरूणांची मारामारी होण्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यावरून गाड्या जोरात चालवणे, चित्र विचित्र आवाज करणे, दुचाकीचे सायलनसर मधून फटाके फोडण्याचे प्रकार वाढले असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
शिक्षणाच्या नावाखाली अनेक मुले रस्त्याने गाड्या जोरात चालवतात. सारख्या गाडीच्या घिरट्या घालतात. या प्रकाराला आळा बसावा म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग, हवालदार अमोल चव्हाण, हवालदार अमोल नलगे यांनी तळेगावात गाड्या पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.





