Pune District : न्हावरेतील कांडगे दाम्पत्यांची दुबईला गवसणी
Pune District : दुबई येथे उभारलेल्या तब्बल ८१५ फूट उंचीच्या भव्य पाळण्याच्या निर्मितीमध्ये गणेश कांडगे यांनी मुख्य डिझायनर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. एकाच वेळी दोन हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पामुळे त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे.

न्हावरे : एका बाजूला दुबईत जगातील सर्वाधिक उंचीच्या पाळण्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे गणेश मारुती कांडगे, तर दुसऱ्या बाजूला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान देणाऱ्या त्यांच्या पत्नी शरयू कांडगे अभियांत्रिकी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या दाम्पत्याने आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या यशाने शिरूर तालुक्यातील न्हावरे गावाची मान उंचावली आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत जागतिक पातळीवर आपली क्षमता सिद्ध करता येते, याचे उदाहरण कांडगे दाम्पत्याने घालून दिले आहे. पतीच्या आंतरराष्ट्रीय यशानंतर पत्नीनेही उच्च शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा अध्याय लिहिला आहे.
दुबई येथे उभारलेल्या तब्बल ८१५ फूट उंचीच्या भव्य पाळण्याच्या निर्मितीमध्ये गणेश कांडगे यांनी मुख्य डिझायनर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. एकाच वेळी दोन हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पामुळे त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. गुंतागुंतीचे तांत्रिक नियोजन, डिझाइन, अभियांत्रिकी कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या अशा प्रकल्पात योगदान देणे ही निश्चितच मोठी कामगिरी आहे. गणेश कांडगे यांच्या यशामुळे न्हावरे गावातील आणखी एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली आहे.
पत्नी शरयू यांचीही तंत्रज्ञानात झेप
पतीच्या यशाची चर्चा सुरू असतानाच शरयू गणेश कांडगे यांनीही शैक्षणिक आणि व्यावसायिक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी जर्मनीतील प्रतिष्ठित आरपीटीयू (RPTU) विद्यापीठातून एम्बेडेड सिस्टीम्स आधुनिक तंत्रज्ञान विषयात उत्कृष्ट गुणांसह पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. शरयू या सध्या नेदरलँड्समधील जगप्रसिद्ध झाइस (ZEISS) कंपनीत वरिष्ठ संशोधन व विकास अभियंता म्हणून कार्यरत आहेत. दहा वर्षांपासून त्या संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. मायक्रोस्कोप लेन्सेस, डिजिटल सर्जिकल सोल्युशन्स, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या विकासात त्यांचे योगदान आहे.
परदेशातील ज्ञानाचा वापर देशसेवेसाठी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव केवळ स्वतःच्या करिअरपुरता मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग देशातील वैद्यकीय सेवेसाठी करण्याची भूमिकाही शरयू कांडगे यांनी अधोरेखित केली आहे. नुकतेच त्यांनी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील डॉक्टरांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शिक्षण पूर्ण
शरयू कांडगे यांच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच कुटुंब आणि मुलांच्या संगोपनासाठी वेळ देत त्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय गाठले. व्यस्त दिनक्रम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, अभ्यास यांचा समतोल राखत त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपले स्वप्न साकार केले आहे. गणेश कांडगे यांचे आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान आणि शरयू कांडगे यांची संशोधन व वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी यामुळे कांडगे दाम्पत्याने न्हावरे गावाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.
त्यांच्या कामगिरीमुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.





