पुणे जिल्हा : “हा विजय माझा नसून मतदारांचा” – कोल्हे

उरूळीत जल्लोषी स्वागत, सत्कार सोहळा
उरुळी कांचन – समोर सत्तेची दादागिरी आणि धनशक्तीची ताकद उभी असताना, केवळ शरद पवारांवरील दृढनिष्ठेच्या बळावर आम जनतेने मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्यासाठी लोकसभेत पाठवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनता माझ्यासोबत राहीली. हा विजय माझा नसून तमाम शिरूर लोकसभेतील मतदार बांधवांचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे केले यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील रवींद्र कला मंदिर येथे शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून दिले. त्याबदल शिरूर – हवेली महाविकास आघाडीच्या वतीने खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मारुती मंदिर ते रवींद्र कला मंदिर यादरम्यान खासदार कोल्हे यांची मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, हवेलीचे जेष्ठ नेते के.डी. कांचन, देविदास भन्साळी, सोपान कांचन, प्रकाश मस्के, माधव काळभोर, संभाजी कांचन, राजेंद्र टिळेकर, सरपंच अमितबाबा कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, दत्तात्रय कांचन, हवेलीचे तालुका अध्यक्ष संदीप गोते, शहराध्यक्ष रामभाऊ तुपे, अर्जुन कांचन, सुभाष टिळेकर, सागर कांचन, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, तालुका अध्यक्षा सुरेखा भोरडे, शिवसेनेचे स्वप्निल कुंजीर, सविता कांचन, यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा हा विजय आहे, कारण सर्वसामान्य मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. मायबाप जनतेने पुन्हा एकदा दाखवलेला विश्वास आणि महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हा विजय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राहुल गांधी आणि इतर सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आशीर्वाद, तसेच सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच विजयाचे गमक आहे.
यावेळी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, के.डी. कांचन, देविदास भन्साळी, भारती शेवाळे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ तुपे यांनी केले.
महाराष्ट्रात सरकार बदलायचे- कोल्हे
कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात 158 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याने, 120 दिवसांनंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत 185 आमदारांना निवडून देऊन महाराष्ट्रातील सरकार बदलण्याचे काम शेतकरी व गोरगरीब जनतेच्या हितासाठी आपल्याला करायचे आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.





