Pune District : बोपदेव घाट घटनेतील तिसरा आरोपी जेरबंद

भवानीनगर : पुण्यातील बोपदेव घाटात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात वालचंदनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील तिसर्या आरोपीला पोलिसांनी शनिवारी (दि. 26) सायंकाळच्या दरम्यान. पाठलाग करून जुने बसस्थानक अकलूज येथे ताब्यात घेऊन अटक केली.
बापू उर्फ दशरथ गोसावी असे या आरोपीचे आहे. वालचंदनगर पोलीसानी आरोपीला रात्री उशिरा पुणे क्राईम युनिट 5 च्या ताब्यात दिले. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. या पथकात हवालदार गुलाबराव पाटील, हवालदार शैलेश स्वामी, सचिन गायकवाड, पोकॉ. विक्रम जाधव, गणेश वानकर यांनी ही कामगिरी केली.
3 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री बोपदेव घाटातील टेबल पॉइंट परिसरात एक 21 वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून दोघांनाही धमकावले. तरुणाला मारहाण करून त्याचे हात शर्टाने आणि पाय पॅन्टच्या पट्ट्याने बांधले. त्यानंतर त्याला झाडाला बांधून आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. ही तरुणी परराज्यातून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आली होती.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता. वालचंदनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे या गुन्ह्यातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. वालचंदनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी यास शिताफीने पकडल्याने वालचंद नगर पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे





