पुणे जिल्हा : वादळी वा-याने होत्याचे नव्हते

बारामतीच्या पश्चिम भागात घर, गोठ्यांचे छप्पर उडाले
मोरगाव – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी (दि. 20) रात्री झालेल्या पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेकांची नवीन घरे व गोठांचे छप्पर हे वादळी वार्याने उडून गेले आहेत. वादळी वारे व पावसामुळे मोरगाव परिसरातील ग्रामस्थांचे लाखो रुपयांची नुकसान झालेले आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी या परिसरामध्ये सोसायटीच्या वार्यासह वादळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरी वार्याचे प्रमाण अधिक असल्याने तरडोली येथील पुष्पा सदाशिव माने, मीनाक्षी सदाशिव माने यांच्या घरावरील पत्रे व काही शेतकर्यांच्या जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेल्याने लोकांना दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ आलेले आहे.
एकीकडे या भागातील जनता पिण्याचे पाण्यासाठी व्याकुळ असताना त्यातच एक नवे अस्मानी संकट शेतकर्यांवर उभे राहिले आहे. जनावरांच्या चार्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सोमवारी झालेल्या पावसाने या परिसरातील शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लोणी भापकर येथे 8 दिवसांपूर्वी झालेल्या वार्यामुळे अशोक बाजीराव गोलांडे यांच घराचा पत्रा तर पांडुरंग संभाजी बनकर यांच्या हॉटेलचा पत्रा उडून गेला आहे.
या वादळी वार्याने झालेल्या नुकसानीमुळे येथील बळीराजाने टाहो फोडला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी झालेल्या वादळी वार्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने या शेतकर्यांचे पंचनामे नोंदवून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे मागणी या परिसरातील शेतकर्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे.





