वाघापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच वित्तमंत्री होतील, असे भाकित खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्तविले आहे. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी या गावात विविध विकासकामांचा शुभारंभ खासदार सुळे व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात आजपर्यंत सुडाच राजकारण कधी झाले नाही. सध्या मी आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी कुठल्याही विकास कामाच पत्र पाठवले की त्यावर काट मारण्यात येते. आता यावेळी शेवटच पत्र लिहिणार जर त्यावर काय झाले नाही तर आम्ही न्यायालयात जाणार पण कदाचित ती वेळ येणार नाही. लोकसभेला लोकांनी खूप साथ दिली. पण कष्टाची परिकाष्ठा करू व या राज्यात रयतेचे राज्य आणण्यासाठी आपणा सर्वांना काम करायचे असे त्यांनी सांगितले. यावेळी सणस मळ्यातील ग्रामस्थांच्या हस्ते सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पाच वाजता व मला एक वाजता आमंत्रण दिले त्यांना मला बोलायचे नव्हते असेही सुळे यांनी आवर्जून सांगितले.