पुणे जिल्हा : …तर मधुमेह मुक्त होऊ शकतो

मधुमेह तज्ज्ञ डॉ. गायकवाड यांचे प्रतिपादन
चिंबळी – मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी आणि मधुमेहापासून मुक्त होण्यासाठी रुग्णाने आहार, विहार, व्यायाम आणि योग्य मार्गदर्शन याद्वारे आपण मधुमेह आटोक्यात ठेवून त्याला मधुमेह मुक्त करू शकतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ, डॉ. गायकवाड डायबिटिस सेंटरचे प्रोफेसर डॉ. अनु गायकवाड यांनी केले.
डॉ. गायकवाड डायबिटिस सेंटर व लायन्स क्लब भोजपुर गोल्ड यांच्या वतीने जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित मोफत मधुमेह तपासणी शिबिरामध्ये 100 पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. त्यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष जीवन सोमवंशी, सचिव लायन मुरलीधर साठे, लायन मुकुंद आवटे, लायन सुदाम भोरे, लायन डॉ दीपाली कुलकर्णी, डॉ. शंकर गायकवाड, डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. अभिषेक गायकवाड, दशरथ चौधरी, आदित्य शेळके, सोनू गव्हाणे, राजेभाऊ खेत्री आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अनु गायकवाड यांनी रिव्हर्सल ऑफ डायबिटीस या विषयावर व्याख्यान दिले.
अनु गायकवाड म्हणाले की, रुग्णांनी त्यांचा मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी वरील चतुसूत्री सोबतच अध्यात्माची जोड असणे आवश्यक आहे. अध्यात्मामुळे रुग्णाला आनंदी राहण्यास मदत होते व त्यामुळे रुग्णांचा मधुमेह आटोक्यात राहतो. तसेच सध्याच्या या बदलत्या आणि डिजिटल युगामध्ये आलेल्या नवीन नवीन उपचार पद्धतीची माहिती डॉक्टरांनी रुग्णांना दिली.
महाजन, मुलाणींना मधुमेह विजेता पुरस्कार
व्याख्यानानंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षी भगवान महाजन व शेहनाज मुलाणी यांना मधुमेह विजेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजेत्यांना सन्मानचिन्ह ,ग्लुकोमीटर आणि तुकाराम महाराजांची गाथा देण्यात आली. तसेच वर्षभर मधुमेहासाठी लागणारे औषधे मोफत देण्यात येणार आणि आजीवन मधुमेह विजेत्याला डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन मोफत देण्यात येणार असे डॉक्टर अनु गायकवाड यांनी सांगितले.





