पुणे जिल्हा : तांबडेमळा, भोरवाडी सिमेंट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे

-पुणे-नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांची सूचना
मंचर – पुणे-नाशिक हमरस्त्यावर आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील तांबडेमळा, भोरवाडी दरम्यान चालू असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठेकेदाराने लक्ष द्यावे, अशी सूचना पुणे-नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली.
सद्यस्थितीत पुणे-नाशिक महामार्गावर तांबडेमळा ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि अवसरी खुर्द ग्रामपंचायत भोरवाडी येथे पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे, पुणे बाजाराकडून येणाऱ्या आणि पुणे बाजूकडे जाणाऱ्या एकाच लेनद्वारे वाहनांची गर्दी होत असल्याने वाहन कोंडी होते.सिमेंटकाम रस्त्याचे काम गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असल्याने एक लेन सिमेंट रस्त्याच्या कामामुळे बंद आहे. तर दुसऱ्या लेनवर पुण्याकडून-नाशिककडे जाणारी वाहने आणि नाशिककडून-पुण्याकडे जाणारी वाहने एकत्रित येत असल्याने वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसह वाहन चालक हैराण झाले आहे.
सद्यस्थितीत दिवाळी सण जवळ आल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या वाढल्या आहे. वाहतूक कोंडीची समस्या वाढल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी पुणे-नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांच्यापर्यंत गेल्याने त्यांनी तांबडेमळा आणि भोरवाडी येथील रस्त्यावरील चालू असलेल्या कामाची पाहणी केली आणि वाहतूक कोंडीची समस्या जाणून घेतली.
यावेळी तांबडेमळ्याचे सरपंच प्राजक्ता तांबडे, विलास तांबडे, शिवाजी तांबडे, दिलीप तांबडे, राजू भोर, अभिजित तांबडे, आशिष तांबडे आणि काम करणारे ठेकेदाराचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून तातडीने सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशीशा सूचना दिल्या. तांबडेमाळा,भोरवाडी ते आकाश हॉटेल खेड घाट या साडेआठ किलोमीटरच्या अंतरामध्ये नऊ मीटर रुंदीने कॉंक्रिटी करण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना संपूर्णपणे एक लाईन बंद करण्यात येते. त्यामुळे एकाच लाईनमध्ये काम करताना वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
अपघात वाढले…
या ठिकाणी सर्विस रोड नसल्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणावर ती काम करताना जाणवत असून नागरिक यामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. शिवनेरी हॉटेल ते गायमुख दरम्यान यामुळे अनेक अपघात होताना दिसत आहेत. कंत्राटदार कंपनीने याबाबत सुरक्षारक्षकांची व वाहतूक कोंडी न होऊन देण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच ठेकेदाराने त्याची स्वतःची माणसे उभी करून वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी लक्ष द्यावे. अशी सूचना केल्याचे सांगण्यात आले.





