पुणे जिल्हा : आठवडी बाजार ठरतोय नागरिकांना वरदान

– दुर्गम भागातील गावांसाठी ठरतोय सोयीचा
विंझर – तोरणा किल्याच्या पायथ्याशी भरणारा आठवडी बाजार हा वेल्हे (राजगड) तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वरदान ठरतोय. राजगड तालुक्यातील दुर्गम भागातील वेल्हे खुर्दसह सुमारे १९ गावांतील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेल्हे येथील आठवडी बाजार हे एक महत्त्वाचे ठिकाण व जवळचे आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जास्त पायपीट करावी लागत नाही. येथे येताना काही गावांचे रस्ते तसे खूप काही चांगले नाही. पण येथे ताजा भाजीपाला, फळे व किराणा यासह आवश्यक वस्तू मिळत असल्याने ग्रामस्थांसाठी हा बाजार सोयीचा ठरत आहे.
गावातील या बाजारात आठवड्याचे अर्थकारण फिरत असते. वेल्हे (राजगड) तालुक्यामधील सर्वसामान्य माणूस हा दुर्गम तालुका असल्याकारणाने वेल्हे गावामध्ये आपापली खाजगी वाहने, सरकारी वाहन, कोणी पायवाटेने आठवडी बाजारात शेतमाल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी या ठिकाणी ये-जा करत असतात. अनेक नागरिकांना या आठवडी बाजाराला ये-जा करण्यासाठी पर्यायी वाहन व्यवस्था नसल्याकारनाने २ ते ५ किमीपर्यंत चालत येताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
परंतु या आठवडी बाजारात येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावायास मिळते. तालुक्याच्या कुंबळे, निगडे, घिसर, निवी, घेवंडे, केळद, पासली, भट्टी वाघदरा, वेल्हे खु, वेल्हे, अंत्रोली, धानेप, विहीर, कोंढावळे, हिरपोडी, पाबे, खरीव, वाजेघर, व लव्ही तसेच तालुक्याच्या इतर भागांमधून अनेक नागरिक आठवडी बाजारामधून भाजीपाला, फळे, विविध जिवनावशक वस्तू व किराणा भरण्यासाठी येत असतात. त्यामुळे वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे बु मधील या आठवडी बाजाराला खूप महत्त्वाचे स्थान असून वेल्हे (राजगड) तालुक्यामधील नागरिकांसाठी हा आठवडी बाजार वरदान ठरतोय.
थेट संवाद…
ताजा स्वच्छ शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध, शेतकरी विक्री करीत असल्याकारणाने मालाच्या प्रतीबाबत खात्री, थेट शेतकऱ्यांशी संवाद होत असल्याकारणाने ग्राहक आपली गरज शेतकऱ्याला सांगू शकतात, थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीचे ग्राहकांना समाधान, भाजीपाला बाजार पेठ उपलब्ध, भाजीपाला खरेदीचे आठवड्याचे नियोजन, एकाच छताखाली भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, दूध, डाळी, प्रक्रिया उत्पादने, ग्रामीण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध, शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत होत असल्याने ग्राहकांना वजनाबाबत विश्वास वाढून वेल्हे (राजगड) तालुक्यातील ग्राहक आणि विक्रेत्यांचे सलोख्याचे संबंध झालेले आहेत.





