Pune District : वाघोलीत रंगणार ‘थार’ साठी बैलगाडा शर्यतींचा थरार

वाघोली : वाघोली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये शुक्रवारी (दि. 14) फायनलमधील पहिल्या क्रमांकासाठी असणार्या थार गाडीसाठी बैलगाडा शर्यतींचा थरार पहावयास मिळणार आहे. 9, 10, 11 फेब्रुवारीला झालेल्या बैलगाडा शर्यतीमधून 70 बैलगाडा सेमीफायनलसाठी निवडले आहेत.
बाईफ रोड येथील फकीरबाबा वाडा येथे उभारण्यात आलेल्या घाटामध्ये तीन दिवस पार पडलेल्या बैलगाडा शर्यतींना जिल्हाभरातून आलेल्या गाडा मालक व शौकीनांनी उदंड प्रतिसाद दिला. तीन दिवसांतील शर्यतीमधून शुक्रवारी (दि. 14) होणार्या शर्यतींसाठी 70 बैलगाडा सेमीफायनलसाठी निवडण्यात आले आहेत. सेमीफायनल नंतर फायनल होणार असून त्यामधून विजेते बैलगाडे बक्षीसपात्र होतील. सायंकाळी विजेत्या बैलगाड्यांना बक्षिसांचे वितरण केले जाईल.
फायनलमधील एक नंबरसाठी महिंद्रा थार गाडी, दोन नंबरसाठी ट्रॅक्टर, तीन नंबरसाठी बुलेट गाडी असणार आहे. त्याचबरोबर स्प्लेंडर, फ्रीज, टीव्ही अशी बक्षिसे बैलगाडा विजेत्यांना असणार आहेत. यासह विजेत्या बैलगाड्यांवर लाखो रुपयांच्या रोख बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.





