पुणे जिल्हा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट कोणाच्या पथ्थ्यावर

बारामती लोकसभा मतदारसंघ : कोणाचे पारडे राहणार जड
दिगंबर पडकर
जळोची – देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीमधील फूटीमुळे २०१९ च्या तुलनेत राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे नेमका फायदा कोणाला होणार, अशी चर्चा सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने दोन वर्षांपूर्वी वातावरण निर्मिती करताना ‘ए फॉर अमेठी’ व ‘बी फॉर ‘बारामती अशी घोषवाक्य वापरली. त्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीत होते. भाजपने आदळआपट केली तरी फरक पडणार नाही, अशी स्थिती होती, मात्र भाजपने लोकसभा प्रवासाच्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची या मतदारसंघासाठी निवड केली होती. त्यामुळे तर हा मतदारसंघ ‘हाय व्होल्टेज’ अशाच स्वरूपाचा ठरला.
भाजपने कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची वातावरण निर्मिती नंतरच्या काळात टिकली नाही. आता राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर घरोबा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी दुभंगली असून, दुसरीकडे खडकवासला, दौंड हे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादीची ठिकाणची ताकद तालुका आणि या कार्यकर्त्यांमध्ये असली, तरी इंदापूर, बारामती वगळता त्यांच्याकडे स्वतःच्या पक्षाचा आमदार नाही आणि आता तर बारामती आणि इंदापूर हे दोनही तालुके भाजपच्या समर्थनात आहेत. महायुतीतील अजित पवार यांचा उमेदवार कोण असणार, अशी चर्चा रंगली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक खडतर मानली जात आहे. मात्र समीकरणे बदलली आणि सहानभूतीचा डाव राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. अजित पवार यांनी बारामतीची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी उमेदवाराची अद्यापही घोषणा केली नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार, अथवा पार्थ पवार असतील तर काय होणार, हा कळीचा मुद्दा ठरू पाहात आहे. सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघात गेली काही वर्षांपासून सातत्याने संपर्क ठेवलेला आहे. त्यातच राष्ट्रवादीतील फुटीची सहानुभूती ही सुप्रिया सुळे यांच्या बाजूने दिसते.
आत्ताच्या परिस्थितीत भाजप लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना वगळून निवडणूक लढवेल, अशी चिन्हे नाहीत. अजित पवार बाहेर पडले तर ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती हा भाजपचा स्वतःचा मतदारसंघ किंवा भाजपची स्वतःची व्यूहरचना असू शकते. सध्याच्या परिस्थितीत ती शक्यता दिसत नाही. खडकवासला, दौंडमध्ये भाजपचे प्राबल्य आहे. दौंडमध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात असे दोन कट आहेत. दौंडमध्ये राष्ट्रवादीची (शरद पवार गट) ताकद तोकडी असल्याचे मानले जाते, तीच परिस्थिती बारामती, इंदापूरमध्ये आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे कोणाच्या हिमतीवर आणि पाठबळावर निवडणूक लढवून जिंकणार आहेत याचा देखील प्रश्न सध्या राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते विचारत आहेत.
विधानसभेत कोणाचे प्राबल्य
इंदापूरमध्ये जेव्हा जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, तेव्हा युतीचा धर्म आघाडीचा धर्म म्हणून हर्षवर्धन पाटलांनी तो पाळला. हर्षवर्धन पाटील हे आघाडीच्या तत्कालीन व्यासपीठावर गेले. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांचे काम केलेच नाही, असा आरोप सातत्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. यावेळी इंदापुरात ना हर्षवर्धन पाटील बरोबर आहेत ना दत्तात्रय भरणे अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे मोठे मताधिक्य कसे मिळवतात याची उत्सुकता आहे.
पुरंदरमध्ये संजय जगताप याही वेळी सुप्रिया सुळेंच्या मदतीला जाऊ शकतात. कारण महाविकास आघाडीतील काँग्रेस हा घटक सध्या तुलनेने बऱ्यापैकी एकत्र असल्याचे दिसते. त्यामुळे पुरंदरमध्ये राष्ट्रवादीची उरलेली कार्यकर्त्यांची फळी आणि संजय जगताप यांची काँग्रेस याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो.
भोरमध्ये पवार आणि थोपटे कुटुंबामध्ये सख्य नसल्याचे पिढ्यान पिढ्यांच्या राजकीय वातावरणातून दिसते. मात्र, काही दिवसांपूर्वीच हे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी भोरच्या दौऱ्यात आमदार पिता पुत्रांची भेट घेऊन या ठिकाणी हे डॅमेज कंट्रोल करत महाविकास आघाडीचा धर्म येथे पाळला जाईल, अशी व्यूहरचना सुरू केली आहे. त्यामध्ये सुळे यांना थोपटे हे खुद्द किती साथ देतात, त्यावर येथील आघाडी अवलंबून असणार आहे. मात्र, या ठिकाणी अजित पवार गटाचा उमेदवार असेल, तर थोपटेंची सहानभूती कदाचित सुप्रिया सुळे यांना जास्त मिळू शकते अशा स्वरूपाचे चित्र सध्यातरी दिसते आहे.
दौंड तालुक्यावर सध्या तरी आमदार राहुल कुल यांच्याच वरचष्मा आहे. मात्र, गटातटाचे राजकारण आणि पवार कुटुंबातच दोन उमेदवार असतील, तर निवडायचे कोणाला असा प्रश्न आहे. जुने जाणते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सहानुभूतीच्या दृष्टीने शरद पवार गटाकडे येतील, अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे दोघांमधील वादाचा फायदा सुप्रिया सुळेंना उचलतात यावरच त्यांची या मतदारसंघातील स्थिती राहीली नाही तरी सुप्रिया सुळेंना या मतदारसंघातून पिछाडीत अनुभवावी लागली आहे.





