Pune District : ढोल, ताशा, लेझीमचा गजर

राजेगावात रंगबेरंगी फुलांची सजावट
मलठण – डोक्यावर विदुषकाची टोपी, हातात रंगीबेरंगी फुले, खाऊ, गुलाबपुष्पाची सजावट, ढोल, ताशा, लेझीम यांचा गजर हे दृश्य राजेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवागतांच्या स्वागतांचे होते.
राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल, ताशा आणि लेझीमच्या गजरात करण्यात आले. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प, खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी मान्यवर आणि शिक्षकांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप, गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी इतर वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचेही स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जिलेबी आणि मसाला भाताचे रुचकर जेवण देण्यात आले.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शहाजी गुणवरे, संदीप टेंगले, गणेश मोरे, गणेश वाघमारे, अरुण भोई, अनिल डंगाणे, शशिकांत थोरात, रामभाऊ परदेशी, शिवाजी काळे, ज्योती साळवे उपस्थित होते. मुख्याध्यापक इंद्रभान गोसावी यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचलन संजय नेमाने यांनी केले. दिलीप शिर्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आप्पासाहेब मेंगावडे, दीपक कदम, तुकाराम उगलमोगले, वैशाली कुदळे यांनी प्रयत्न केले.





