Pune District : कडेधेत आरओ प्लांटच गिळला

राजगुरूनगर : कडधे (ता. खेड) गावात शासनाच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत रिव्हर्स ऑस्मोसिस प्लांट (आरओ) मध्ये 2 लाख 69 हजार 381 रुपयांचा अपहार झाला आहे. गावात आरओ प्लांट न करता परस्पर पैसे काढून घेतले. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सबंधित ठेकदाराला तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांनी आलेल्या निधीचे सर्व पैसे 7 एप्रिल 2022 रोजी अदा केले. तथापि प्रत्यक्षात प्लांट बसलाच नाही. या प्लांटचे काम गावातील एका सदस्याने एका ठेकेदाराच्या नावावर घेतले मात्र ते पूर्ण न करता संपूर्ण निधी रक्कम काढून घेतली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या आरओ प्लांटचे काम न करता धनादेशाद्वारे सरपंच ग्रामसेवक यांनी पैसे दिले कसे? मूल्यांकन दाखला देणारे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांनी मूल्यांकन दाखला दिला कसा? ग्रामपंचायतीच्या जबाबदार पदाधिकार्यांनी ही रक्कम परस्पर लाटल्याचा आरोप विकास सोसायटीचे संचालक रामदास नाईकडे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी मिरजे यांसह ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, सरपंच प्रियांका देवदरे यांनी याबाबतची माहिती देण्याचे टाळले.
ग्रामस्थांनी उपस्थितीत केलेले प्रश्न
कडधे येथील कुलदैवत खंडोबा मंदिर आवारातील आर.ओ. आहे असे दाखवले. मात्र तेथे वीजजोड नाही, पाण्याचे एटीएम नाही, पाण्याच्या टाक्या नाहीत, फिल्टर यंत्रही नाही. याशिवाय फाऊंडेशन, प्लबिंग असे काहीच नाही. अधिकार्यांनी मूल्यांकन केले तरी कसे, आदी सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
आपण घरगुती फ्रीज घेतला तरी त्यासाठी स्टँड घेतो. येथे ग्रामपंचायतीने जवळपास पावणे तीन लाख रुपये खर्च करून कोणतीही तरतूद केलेली दिसुन येत नाही.या संपूर्ण बाबीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.
– रामदास नाईकडे, संचालक, कडधे सोसायटी
2022 मध्ये प्लांट बसवला होता. त्याला वीजपुरवठा केला नव्हता. त्यामुळे हा प्लांट सुरू झाला नव्हता. सहा महिने झाल्या नंतर बिघाड झाल्याचे सांगुन दुरुस्तीसाठी देण्यात आला. तो अद्याप बसवलेला नाही; मात्र चौकशी सुरू झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत प्लांट बसवला जाईल, असे ठेकेदाराने तातडीने कळवले आहे. डोंगर पठारावर उन्हाळा जाणवत आहे. नागरिकांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय होणे गरजेचे आहे.
– सचिन नाईकडे, उपसरपंच, कडधे





