उपमुख्यमंत्री अजितदादांचा वाढदिवस काटेवाडीत साजरा काटेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ६६ वा वाढदिवस काटेवाडी (ता. बारामती) येथे अत्यंत उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी भरलेला साजरा करण्यात आला. पालखी ओटा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. काटेवाडी गावचे भूषण असलेले अजित पवार हे केवळ गावापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत केवळ काम आणि विकासावर भर देणारे नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. विकासाचा ध्यास आणि तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न हे त्यांचे खरे वैशिष्ट्य आहे, असे ग्रामस्थांनी यावेळी अभिमानाने नमूद केले. श्री छत्रपती हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (काटेवाडी) व मासाळवाडा येथील विद्यार्थ्यांना शारदा पतसंस्था आणि शिवाजी काळे यांच्या माध्यमातून शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अजित पवार यांच्या प्रेरणेतून श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा स्वखर्चाने उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी विद्यार्थी चांगले शिक्षण घेत आहेत. ग्रामपंचायत सदस्य अजित रमेश काटे यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे वर्षभर संगोपन केले, तर त्यांना पुढील वाढदिवसाच्या दिवशी योग्य बक्षीस दिले जाईल.” या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. गावकऱ्यांचा अभिमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मगावात त्यांचा वाढदिवस केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जातो, हे या उपक्रमांतून अधोरेखित झाले. गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्याला मानाचा मुजरा दिला.