Pune District : वाघोलीसह सात ठिकाणी महापालिका उभारणार अत्याधुनिक स्वच्छतागृह

वाघोली : पुणे शहरात येणार्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, पुणे महानगरपालिकेने शहरातील प्रमुख प्रवेशद्वारांवर वाघोलीसह सात ठिकाणी अत्याधुनिक आणि वातानुकूलित ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छतागृहांसाठी महापालिकेने नुकतेच प्रस्ताव देखील मागवले आहेत. यामुळे शहरात येणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शहराच्या प्रवेशद्वारांवर अद्ययावत स्वच्छतागृहांची वानवा असल्याने नागरिकांना, विशेषत: बाहेरगावाहून येणार्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारणीच्या दिशेने काम सुरू केले आहे. प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन, शहरातील सात प्रमुख ठिकाणी ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. चांदणी चौक, बाणेर, अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली, सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी, पुणे विमानतळाजवळ आणि पुणे रेल्वे स्टेशनजवळ तसेच सातारा रस्त्यावरील कात्रज चौक आणि पुणे-मुंबई रस्त्यावर ही ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
प्रत्येक स्वच्छतागृहासाठी साधारण पन्नास लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही स्वच्छतागृहे उभारणे, त्यांची देखभाल करणे यासाठी विविध पर्यायांसह इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ‘पे अँड यूज’ या तत्त्वावर ही स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच, स्वच्छतागृहाची उभारणी आणि देखभाल दुरुस्ती यासाठी उत्पन्नाचे पर्याय म्हणून या ठिकाणी संबंधिताला जाहिरातींचे हक्कही देण्याचा विचार आहे.
तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था
या वातानुकूलित ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहांमध्ये नागरिकांना आंघोळीची व्यवस्था, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली आणि अद्ययावत प्रसाधनगृहाची सोय असेल. तसेच मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा आणि वायफाय सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, महिला आणि पुरुषांसह तृतीयपंथीयांसाठी देखील येथे स्वतंत्र व्यवस्था असेल. दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था असणार आहे. स्वच्छतागृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असतील.





