पुणे जिल्हा : जुन्नरमधील अतिदुर्गम भाग तहानलेला

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : युवकाने भागवली तहान
माळशेज – जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील सांसद आदर्श ग्राम योजनेतील काही गावांची तहान उदापूर येथील रोहिदास शिंदे स्वखर्चाने पाण्याचे टॅंकर सुरु करुन भागवली आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या नागरिकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे.
रोहिदास शिंदे यांच्या समवेत मंगेश शिंदे, राजू अमुप, विनोद भोर, राजेंद्र शिंदे, रवी शिंदे, दुष्यंत बनकर यांनी पाणी वाटपासाठी सहकार्य केले. जुन्नर तालुक्यातील मुथाळणे, मांडवे, जांभूळशी, कोपरे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना काही केल्या हा प्रश्न सुटलेला नाही;
मात्र जुन्नर तालुक्यातील कोपरे-जांभुळशी हे गाव खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी दत्तक घेतलेले आहे; परंतु तरीदेखील देखील येथील पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटला नाही. त्यामुळे यंदाही या गावातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या चारही गावातील भागांमध्ये टॅंकरने पाणी देऊनही पाणी पुरत नसल्यामुळे पाण्याला वाढती मागणी आहे.
उदापूर गावाच्या जडणघडणीसाठी या आदिवासी जनतेचा मोठा वाटा आहे याच भागातील शेतमजूर उदापूरला येऊन शेतकऱ्यांच्या उपयोगी पडत आहे तसेच आपला शेजारी पाण्यावाचून अडचणीत आहे त्यामुळे आपण ही मदत करत असून इतरांनीही पुढे येऊन जमेल त्या पद्धतीने पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले पाहिजे, असे आवाहन रोहिदास शिंदे यांनी केले आहे.





