Pune District : बेपत्ता महिलेच्या नावावरील जमीन परस्पर विकली

ओतूर : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता महिलेच्या नावावरील जमिनीचे दुसरीच महिला दाखवून खरेदीखत करत बेपत्ता महिलेच्या नावावरील जमीन विकून वारसदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र लिंबाजी खरात (रा. येडगाव, ता. जुन्नर), कमल चंद्रकांत भद्रिगे (रा. आळे, ता. जुन्नर), विलास शंकर हिलाल (रा. बेल्हे, ता. जुन्नर), विशाल पांडुरंग सोनवणे (रा. कुरुळी, ता. खेड) अशी चौघांची नावे आहेत. याबाबत विजय तुकाराम देठे (वय 52, सध्या रा. मानव ज्योत सोसायटी, मुलुंड पश्चिम, मुंबई; मूळगाव पिंपरी पेंढार, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विजय देठे यांच्या आजी सरुबाई सखाराम तपासे ह्याचे नावे असलेली विविध ठिकाणची जमीन चार आरोपींनी संगनमत करून व शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून, कटकारस्थान करून दुसरीच महिला उभी केली. सरुबाई तपासे या बेपत्ता असताना देखील पिंपरी पेंढार येथील शेतजमीन गट नंबर 1093, गट नंबर 1105, गट नंबर 387मधील एकूण 140.50 आर जमीन विशाल पांडुरंग सोनवणे यास खरेदीखत क्र. 6611/2023 अन्वेय 28 डिसेंबर 2023 रोजी विक्री केली आहे.
याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी माहिती दिली की ज्या महिलेच्या नावावर जमीन आहे. ती महिला बेपत्ता असताना, तिच्या जागी दुसरीच महिला उभी करून जमिनीचे खोटे खरेदीखत करत ती विकून वारसदारांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





