Pune District : दौंडज खिंडीत घाणीचे साम्राज्य

वाल्हे – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंडीत (ता.पुरंदर) येथे मागील काही दिवसांपासून,कचरा टाकण्यात येत असल्याने,या पवित्र समजल्या जाणाऱ्या दौंडज खिंडीत घाणीचे साम्राज्य वाढत आहे.
मंगळवार, दि.२४ रोजी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन होणार आहे. खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन,श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात, वाल्मिकींच्या वाल्हे नगरीकडे बुधवार (दि.२५) मार्गस्थ होणार असून,दरम्यान,या मार्गावरील,सह्याद्रीच्या पहुडलेल्या वाटांनी प्रवास करताना,भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेत.
वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होतानाच,सकाळची न्याहरी,सह्याद्रीच्या पर्वत रागांच्या कुशीमधील पवित्र दौंडज खिंडीमध्ये सर्व वैष्णव क्षणभर विश्रांती घेऊन,पुढे वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होत असतात. या दौंडज खिंडीमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले घाणीचे साम्राज्य वैष्णवांच्या आरोग्यांस धोकेदायक ठरू शकते. यामुळे संबंधित विभागाकडून याची दखल घेऊन, या परिसरात स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान,दौंडज खिंड परिसरात लोहमार्ग बाजूस टाकण्यात आलेल्या या कचऱ्यांमुळे, सद्यःस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे, गवत, दलदल होऊन डास व माशांमुळे सर्वच विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, निमोनिया यासारख्या आजारांचा धोका वारीदरम्यान,वैष्णवांना होण्याचा धोका निर्माण होत असून,त्या कचऱ्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमीकडून होत आहे.





