Pune District : बांगलादेशींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

नारायणगाव : नाशिक शहरातील आडगाव परिसरातून शहर पोलिसांनी आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले असून त्यापैकी तीन बांगलादेशी नागरिकांकडे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील आधारकार्ड आढळून आले आहे, अशी माहिती आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी दिली. त्यामुळे बांगलादेशींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बांगलादेशी नागरिक अवैधरित्या भारतात आले असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनधिकृत वास्तव्य करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. म्हणूनच प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा काम करीत असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. नाशिक जवळील आडगाव येथून पोलिसांनी आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले असून अवैधरित्या भारतात आल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी अलीम सुआनखान मंडल (वय 32), अलअमीन अमीनुर शेख (वय 22), मोसिन मोफिजुल मुल्ला (वय 22) यांच्याकडे आधार कार्ड व रहिवासी दाखले नारायणगाव येथून काढण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नाशिक पोलिसांना नारायणगाव येथील कोल्हे मळा, भुजबळ चाळ येथील रहिवासी दाखला मिळून आला असून संशयिताने ग्रामपंचायतीतील एका महिलेस हाताशी धरून आधार कार्ड काढल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड अथवा महत्त्वाचे कागदपत्र बांगलादेशी नागरिकांना उपलब्ध करून दिले जात असतील तर संबंधितावर कारवाई होणे गरजेचे असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक जवळील आडगाव येथून आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैधरित्या भारतात राहत असल्याचे उघड झाले असून त्यापैकी तीन बांगलादेशी नागरिकांकडे नारायणगाव येथील आधार कार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच पुढील तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
– सचिन खैरनार, पोलीस निरीक्षक, आडगाव पोलीस ठाणे





