पुणे जिल्हा : उन्हाची वाढती तीव्रता पशु पक्षांसाठी चिंताजनक

पक्षांसाठी दाणा पाण्यासह खाद्य ठेवण्याचे प्राणीमित्रांचे आवाहन
शिक्रापूर – सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पक्षांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे पक्षांचे बळी रोखण्यासाठी नागरिकांनी सध्या पक्षांना दाणा पाणी ठेवण्याचे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे यांसह प्राणीमित्रांनी केले आहे.
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत चालेलेली असताना पारा देखील उच्चांक गाठू लागला आहे. कित्येक ठिकाणी नदी, ओढे कोरडे पडल्याने विहिरी तळ गाठू लागल्याने शेतकर्यांची पिके धोक्यात आलेली आहेत. शेतामध्ये पाणी नसल्याने असंख्य पक्षी पाण्याच्या शोधात मनुष्यवस्ती तसेच घरांकडे धाव घेत आहेत; परंतु सध्याच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे काही पक्षांचा पाण्या अभावी मृत्यू होण्याची चिन्हे निर्माण होत आहे.
सध्या अनेक ठिकाणी नागरिक जागरूक झालेले असल्याने पक्षांना पाण्याची व्यवस्था करत आहेत; मात्र निसर्ग राखण्यासाठी पक्षांची मोठी गरज आहे. पक्षी टिकले तरच निसर्ग टिकणार असल्याने पक्षांच्या संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. सध्या नागरिकांनी शक्य तेथे पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करत मूठभर धान्य पक्षांना टाकणे गरजेचे आहे.
पुढील काही दिवस नागरिकांनी पक्षांना पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर तसेच घराच्या छतावर पाणी ठेवावे असे आवाहन देखील निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक दिपक बनसोडे, राहुल त्रिकुटे यांनी केले आहे.





