Pune District : तालेवार बागायतदार होतोयं भूमिहिन

राहू : दौंड तालुूक्यातील राहू व बेट परिसर सधन भाग म्हणून ओळखला जातो. तशी परिस्थिती देखील आहे. मुळा- मुठा व भीमा नदीच्या संगमावर राहू बेटातील गावे येतात. नदीच्या कडेने असलेली काळी कसदार जमीन, बारा महिने पाण्याची उपलब्धता, पुण्यासारख्या स्मार्ट व सांस्कृतिक शहराजवळ असल्यामुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध आदी भौतिक सुविधांमुळे बेट परिसरात सधनता पाणी भरत आहे. परंतु हा तालेवार बागायतदार आता पिढ्यान्पिढ्या जपलेली काळी मातीची विक्री करीत आहेत.
बेट परिसरातील अनेक गावे अशी आहेत की, त्या गावातील 40 ते 50 टक्के जमिनी या बाहेरील व्यक्तींनी विकत घेतल्या आहेत. तेवढेच मूळ जमीन मालक हे आपल्याच गावात उपरे किंवा भूमिहीन म्हणून वावरत आहेत. किंबहुना ज्यांना जमिनी विकल्या. त्यांच्या शेतावर रोजंदारीने किंवा वाटेकरी (उत्पन्नातील 25 किंवा 50 टक्के हिस्सा) मजूर म्हणून काम करीत आहेत. आत्तापर्यंत काळ्या मातीचा लिलाव केला. मात्र, भविष्यात अशीच स्थिती राहिली तर राहू बेटावर धोक्याची घंटा आहे.
जमिनीचे वाढलेले दर कारणीभूत
राहू बेट परिसर हा पुणे किंवा वाघोलीसारख्या बाजार पेठांच्या जवळ असल्याने याचा काही प्रमाणात का होईना परिणाम होत आहे. या शहरांप्रमाणे जमिनीचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी हे जमीन विकत आहेत. हे शेतकरी आपल्या पुढील पिढीचाही विचार करीत नाही, हे दुर्देव आहे.
भौतिक सुविधांमागे धावणारा समाज
जमिनीचे दर वाढल्यामुळे कधीही एवढा पैसा पहिला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गरजेसाठी तर काही शेतकऱ्यांनी मौज मजेसाठी जमिनी विकल्या आहे. त्या शेतकऱ्यांनी पुढील पिढीचा विचार केला नाही. जमिनी जास्त असल्यामुळे थोडी जमीन विकल्यावर काय फरक पडतो, अशी मानसिकता झाली आहे. परंतु थोडी थोडी करता अनेक शेतकरी हे भूमिहीन झालेले आहेत. काही शेतकरी दहा एकराचे दहा गुंठ्यांवर कधी आले, हे त्यांना देखील समजले नाही.
प्लॉटिंगच्या नादात फज्जा
वाघोलीसारख्या शहराच्या जवळ असल्यामुळे गुंठेवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन एकराची किंमत दहा गुंठ्यांत मिळत असल्यामुळे तरुण शेतकरी या व्यवसायात उतरले. परंतु महसुली जाचक अटी, भागीदारीमुळे फसवणूक, मार्केटिंगचे ज्ञान नसणे, कमी प्रतिसाद आदी कारणामुळे अनेक तरुण या व्यवसायात लाखो रुपये गुंतून बुडाले आहेत. त्यातून बाहेर निघण्यासाठी वडिलोपार्जित जमीन विकण्याशिवय त्यांच्या समोर कोणताच पर्याय रहात नाही.
राजकीय ज्वर
राहू बेट हा भाग सधन असल्यामुळे पहिल्यापासूनच राजकारण हा मुद्दा प्रतिष्ठेचा मानला जातो. पूर्वीचे राजकारण हे वेगळे होते. राजकारण करता असताना घरातून भाजी भाकरी बांधून घेऊन राजकारण केले जात होते. परंतु अलीकडील राजकारणात अर्थकारणाला मोठे महत्व आले आहे. उच्च राहणीमान, प्रतिष्ठा जपण्याच्या नादात होणारा भरमसाठ खर्च व राजकारणातून मिळणारे शून्य उत्पन्न आदी कारणामुळे अनेकांची राजकारणाची हौस भागविण्यासाठी अनेकांनी आपल्या जमिनीचा धुरळा केलेला आहे.
भविष्यात रडण्याची वेळ येईल
बेट परिसर हा दोन्ही नद्यांच्या मध्ये असल्यामुळे बेट म्हणून ओळखला जात असला तरी आता वाघोली राहू रोड हा चार पदरी सिमेंटचा होत आहे. त्याची कनेक्टिव्हिटी ही दौंड, केडगाव म्हणजेच सोलापूर महामार्गाला आहे. शिरूर व दौंडच्या सीमेवर असणाऱ्या टाकळी भीमा (शिरूर) व टाकळी भीमा (दौंड) या दोन्ही गावांना पर्यायाने दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर आहे. या पुलामुळे अहिल्यानगर महामार्ग ते पुणे सोलापूर महामार्ग हे दोन्ही महामार्ग जोडले जाणार आहेत. भविष्यात राहू बेटातील जमिनींना सोन्याची किंमत येणार आहे. त्यामुळे आत्ता जमिनी विकल्या तर थोड्याच दिवसात पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे.





