Pune District : गहू पिकाला बसतोय उन्हाचा चटका

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील वाल्ह्यासह परिसरात मागील 15 दिवसांपासून वातावरण बदल होऊन उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा फटका रब्बी हंगामातील बहुतांश पिकांना बसत आहे. उशीरा पेरणी केलेले गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांमधील दाणे परिपक्व होण्यासाठी थंडीची आवश्यकता असताना उन्हाचा चटका वाढत असल्याने या पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होत आहे.
यावर्षीही वाल्हे व परिसरात मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अल्प प्रमाणात पडला होता. मात्र, पिंगोरी, कवडेवाडी खो-यांमध्ये तसेच दौंडज खिंड तसेच सह्याद्रीच्या पर्वत रागांच्या परिसरात संततधार पाऊस पडल्याने वाल्हे गावातून वाहणा-या दोन्ही ओढ्यातून यावर्षी पाणी वाहिले होते. यामुळेच ओढा व परिसरातील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली होती.यामुळेच मागील वर्षापेक्षा यावर्षी वाल्हे व परिसरात गहू पिकांचा पेरा, पोषक वातावरण असल्याने व उपलब्ध पाणीसाठ्यावर यंदा रब्बी पिकांची पेरणी वाढली.
मागील काही महिन्यात बदलत्या हवामानाचा मोठा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला होता.अचानक वाढत असलेले ऊन यामुळे गहू उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच पिकांनाही या बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील दोन महिन्यांत पिकांना पोषक अशी थंडी पडत होती. या थंडीने पीके जोमात आली असून अचानक उन्हाचा चटका वाढल्याने गव्हाच्या पिकांला या वाढत्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मागील वर्षीदेखील उष्णतेच्या लाटेमुळे फटका
मागील वर्षीदेखील उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. यावर्षीही आता वाल्हे परिसरात तापमानात मागील 15 दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत चालला आहे. यामुळे गहू उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
थोडी खुशी – थोडा गम
मागील काही दिवसांपासून,अचानक वाढती उष्णतेचा सामना येथील शेतकरीवर्गाला करावा लागत असून या अचानक वाढत्या उष्णचे चांगला तसेच परिणामकारक असे दोन्ही प्रकारचे फायदे शेतकरीवर्गाला होणार असल्याने, थोडी खुशी – थोडा गम’ असी चर्चा शेतकरीवर्गामधून आहे.





