पुणे जिल्हा : सरकारला समाजापुढे झुकावे लागेल – मनोज जरांगे

शांततेचे युद्धच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल
राजगुरूनगर : मराठा समाजाचे शांततेचे युद्धच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल. सरकारला आपल्यापुढे झुकावे लागेल. आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राजगुरूनगर येथे केला.
राजगुरूनगर येथे खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 20 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून झाली. आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान केला यावेळी मनोहर वाडेकर, अंकुश राक्षे, शंकर राक्षे, निलेश आंधळे यांच्यासह खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य व राज्यभरातून आलेले लाखो मराठा बांधव उपस्थित होते.
जरांगे पाटील म्हणाले, सरकारच्या टेबलावर केवळ मराठा आरक्षणाची फाइल आहे. कोणताही कायदा आधार असल्याशिवाय केंद्र आणि राज्य सरकार पारित करीत नाही. मराठामध्ये दोन प्रकार आहेत. एक क्षत्रिय दुसरा कुणबी. मराठा शेती कसतो, घाम गाळतो, मग तो कुणबी होत नाही का? असा सवाल करीत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी एकीकडे मराठा समाज लाखोंचे मोर्चा काढत आहेत तर आंदोलने मोडीत काढण्यासाठी आपलेच लोक आपल्या अंगावर घालण्याचे प्रकार सरकार करीत आहेत. त्यामुळे अंगावर येणाऱ्याला शांततेने उत्तर द्या आरक्षणाचे दान गरीब मराठा समाजाच्या पदरात मला द्यायचे आहे. त्यासाठी मराठा स्वयंसेवकांनी आपल्या गावातील मराठ्यांच्या घरी जाऊन आरक्षण का हवे, हे समजावून सांगावे. कोणीही आरक्षणासाठी आत्महत्या, उद्रेक, जाळपोळ करू नका. मराठा आरक्षणासाठी चाकणमध्ये व राज्यात मराठा समाजावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत ते सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी केली.
जरांगे म्हणाले, गद्दारी करणारी आपली औलाद नाही. मराठा जातवान आहे. मरेपर्यंत समाजाशी गद्दारी करणार नाही. येत्या 22 तारखेला काय आंदोलन करणार याची दिशा सांगितली जाईल. जे आंदोलन करणार ते सरकाराला पेलवणारे नसणार आहे. असा सज्जड इशारा जरांगे यांनी सभेत सरकारला दिला. मराठा समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू सरकार 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देईल असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे.
सरकार टेन्शनमध्ये
13 दिवस उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितले आहे. पण मी आराम केला तर मराठांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. मराठ्यांच्या ताकदीमुळे सरकार टेन्शनमध्ये आले आहे. मराठ्यांच्या पदरात आरक्षणाचे दान टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाच्या मागे ठाम पणे उभे राहणार आहोत. मराठ्यांचे आग्यामोहोळ पाहून सरकारला आरक्षण द्यावेच लागेल.
तरुणाचा गोंधळ
जरांगे पाटील यांचे भाषण संपताच एक तरुण स्टेजवर येत मी इंजिनियर आहे, मराठा आरक्षण मिळाले नाही तर मी आत्महत्या करील असा इशारा देत मला भाषण करायचे आहे, म्हणून माईकवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला संयोजक आणि पोलिसांनी अटकाव करीत ताब्यात घेतले. जरांगे पाटील यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मराठा आमदारांचा निषेध
मराठा आरक्षण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे सरकारमध्ये मराठा समाजाचे 174 आमदार असताना त्यांची समाजाप्रति मराठा आरक्षण मिळण्याची भूमिका नाही आम्ही त्यांचा निषेध करतो. 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर येत्या दसऱ्याला पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह केंद्र आणि राज्यातील नेत्यांचे फोटोंचे रावणदहन केले जाईल. यावेळी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोहर वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले शंकर राक्षे यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.





