पुणे जिल्हा : राजगुरूनगरातील साखळीचे रुपांतर उपोषणात

खेड तालुक्यात मराठा समाज आक्रमक : आंदोलनाची दाहकता वाढली
राजगुरुनगर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे, त्याला पाठिंबा म्हणून राजगुरूनगर येथे उपोषण गुरुवार (दि.26) पासून सुरू केले आहे. राजगुरूनगर येथे गेली 25 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषणाचे रूपांतर गुरुवारपासून (दि 26) उपोषणात झाले आहे. मराठा क्रांती संघांचे अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, विकास ठाकूर, अजय स्वामी, या युवकांनी उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा आंदोलनाचे नेते मनोजने जरांगे पाटील यांना 40 दिवसांचा अल्टिमेट देवूनही सरकारने मराठा आरक्षणासाठी ठोस भूमिका घेतली नाही. सरकारच्या या फसव्या आश्वासनामुळे राज्यातील मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्याने राज्यातही ठिकठिकाणी त्याला पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, खेड तालुक्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेली 25 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. त्या काळात राजगुरूनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भव्य विराट सभा झाली. त्यानंतर तालुक्यात राजकीय नेत्यांना गाव प्रवेश नाकारला.
आरक्षण न दिल्याने दसऱ्याच्या दिवशी सुमारे 40 गावांमध्ये राजकीय नेत्यांचे फोटो लावून रावण दहन केले. बुधवारी (दि. 25) जागतिक हब असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीत कामगारांना घेऊन जाणाऱ्या हजारो बस रोखल्या. सरकार आरक्षणाबाबत निर्णय घेत नसताना दुसरीकडे आंदोलनाची दाहकता वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवापासून राजगुरूनगरमध्ये पाच युवकांचे उपोषण सुरू झाले आहे.





