पुणे जिल्हा : हवेलीत राजकीय वर्चस्वाची लढाई रंगणार

कंद, कटके, पवार यांच्या समर्थकांमध्ये रणधुमाळी होणार
दत्तात्रय गायकवाड
वाघोली – विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण हवेली तालुक्यात निर्माण झाले असतानाच आगामी होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि हवेलीतील काही गावांमध्ये होणार्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय रंगतदार अवस्थेत येणार आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या प्रदीप कंद, माऊली कटके, अशोक पवार यांच्या राजकीय वर्चस्वाची लढाई पुन्हा एकदा हवेलीकर अनुभवणार आहे.
बदलत्या राजकारणाची सवय
खासदारकीला शिरूर आणि हवेलीमधून अमोल कोल्हे यांना चांगले मतदान झाले होते. याच मताधिक्याच्या बळावर खासदारकीची माळ कोल्हे यांच्या गळ्यात पडली. याउलट आमदारकीला महायुतीमधून लढलेल्या माऊली कटके यांच्यावर मतांचा वर्षाव झाल्याने कटके यांचा विजय रोमहर्षक ठरला; मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये ही वर्चस्वाची लढाई दिसली; परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकात ही लढाई स्वबळाची होणार असल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने तशी तयारी करण्याच्या सूचना इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढल्या जाणार असल्याने विविध राजकीय पक्षांची अस्तित्वाची लढाई हवेलीत अनुभवायला मिळणार आहे.
त्यात तिघांची पुन्हा अस्तित्वाची लढाई
भाजपचे नेते प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार हे तिघे विधानसभेसाठी इच्छुक होते. माऊली कटके यांना हवेलीमधून मिळालेले मताधिक्य विचारात घेता पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या भाजपने तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने व इतर मित्र पक्षांनी प्रामाणिक काम केल्याने मिळालेल्या विजयामध्ये मतांची आघाडी मोठ्या प्रमाणात दिसून आली. याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक पवार यांना दुसर्या क्रमांकाची मते मिळाली आहे. त्यांना देखील काँग्रेस आय, उद्धव ठाकरेंची शिवसेना व इतर मित्र पक्ष यांनी मोलाची मदत करून गावोगावी आपला गट कायम ठेवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पुणे महानगरपालिकेच्या होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिघांच्या दिग्गज समर्थकांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी अनुभवायला मिळणार असल्याने हा सत्ता संघर्ष ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसणार असून यात कोण वर्चस्व प्रस्थापित करणार आहे हा येणारा काळच स्पष्ट करणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या चेहर्यांना संधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कटके, भाजपकडून प्रदीप कंद, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अशोक पवार स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपल्याकडे विकासाभिमुख तरुण सहकार्यांना, काही ठिकाणी अनुभवी सहकार्यांना संधी देऊ शकतात अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हवेलीमधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळून विजयी होणारे उमेदवार हे आगामी विधानसभेसाठी महत्त्वाचे बदल घडून आणणारे कार्यकर्ते ठरणार असल्याने ह्या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसणार आहे.
आघाडी किंवा समर्थक पक्षांची मते निर्णायक
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना, इतर सामाजिक संस्था व पक्ष यांचे कार्यकर्ते कोणाला पाठिंबा देतात, कोणाला निवडणुकीत उभे करतात आणि कोणा सोबत राहतात यावरून त्या निवडणुकीचे महत्त्व सिद्ध होणार आहे. याशिवाय काही ठिकाणी समर्थकांचा गट किंवा आघाडीचा उमेदवार किंवा युतीचा उमेदवार देखील पहावयास मिळणार असल्याने निवडणुका अतिशय अतितटीच्या होणार आहेत.





