पुणे जिल्हा : गुलाबी थंडीत राजकीय चर्चांमुळे वातावरण गरम

लोणी काळभोर – गेल्या आठवड्यापासून वातावरणातील थंडी वाढल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटत आहेत. या शेकोटीजवळ घरातील आबालवृद्धांसह लहान मुले तसेच शेजारील मित्रमंडळीही जमू लागल्याने गप्पांचे फड रंगू लागले आहेत. या गप्पांच्या फडात कोण किती मताधिक्याने निवडून येणार, तालुक्याचा आमदार कोण होणार, कोण कुठे आघाडीवर, कोण कुठे पिछाडीवर आहे, याच विषयावर प्रामुख्याने चर्चा होत आहे.
या शेकोटीसाठी लागणारा लाकुडफाटा ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने या शेकोट्यांचा अग्नी सतत धगधगत असतो. सकाळी – संध्याकाळी शेकोट्या पेटल्यानंतर घरातील आबालवृद्ध, लहान मुले, शेजारी राहणारे, आपले मित्र, नातेवाईक हे शेकोटीजवळ आपोआप येतात. यामुळे नात्यांतील एकता वाढत असल्याने या शेकोटीजवळ थंडी दूर करण्याबरोबरच आत्मियता निर्माण होत असल्याने विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुलाबी थंडीचा कडाका वाढला असून, यात विधानसभा निवडणुकीच्या राजकीय गप्पा ओघाने चांगल्याच रंगत आहेत. त्यामुळे वातावरण गरम होत असल्याचे दिसून येते. निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने कोणता उमेदवार निवडून द्यायचा याबाबत नेतानिहाय, पक्षनिहाय विचारमंथन करताना दिसून येत आहेत.
थंडीपासून बचावासाठी पेटवलेल्या शेकोट्यांभोवताली या गप्पा जोरदार रंगत आहेत. अनेक नेत्यांचे व पक्षांचे समर्थक एकाच ठिकाणी जमत असल्याने अनेकदा तात्विक खटकेही उडत आहेत. कधीकधी मुद्यावरून सुरू झालेली चर्चा गुद्द्यांवर येते की काय? अशी स्थिती निर्माण होत आहे; मात्र वेळीच समंजस कार्यकर्त्याच्या मध्यस्थीने वाद निवळत आहे. एकंदरीत गुलाबी थंडीत राजकीय चर्चेमुळे वातावरण गरम होत आहे.





