Pune District : पळसनाथाचे प्राचीन मंदिर पुन्हा उजनीच्या कुशीत

पळसदेव –उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत पळसनाथाचे प्राचीन मंदिर पुन्हा उजनीच्या कुशीत गेल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी (मार्च ते जून 2024) सुमारे चार महिने पाण्याबाहेर राहिल्यानंतर पावसाळ्यात मंदिर उजनीच्या पाण्यात बुडाले होते. यानंतर यंदा उन्हाळ्यात मंदिराचा निम्मा भाग पाण्याबाहेर आला होता; परंतु मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनीतील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने, पाणलोट क्षेत्रात असलेल्या पळसनाथ मंदिराने पुन्हा जलसमाधी घेतली आहे. प्राचीन स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचे दर्शन घडविणार्या या मंदिराची पाहणी करण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची येथे वर्दळ असते. परंतू आता पुन्हा काही महिन्यांसाठी मंदिर पाण्यात गेले आहे.
पळसनाथाचे हे प्राचीन मंदिर चुना व भाजलेल्या विटांमधून बांधण्यात आले आहे. पाषाणी शिळांच्या आधारावर मंदिराचा पाया भक्कमपणे उभा आहे. मंदिराचे प्रवेशव्दार पंचशाखीय आहे. यावरती व्याल, पज्ञत्र, स्तंभशाखा, वेलीशाखा, वाद्यसंहित गंधर्व आणि सुरसुंदरी आहेत. विरघळ, भग्ननंदी, भग्नमारुती, दशावतार, शिल्पपट, सतीशिला पाषाणवर कोरलेल्या आहेत. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशव्दार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे हे मंदिर आहे; मात्र या सगळ्या गोष्टी मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आल्यानंतर पाहायला मिळतात. संपूर्णपणे पाण्याबाहेर आलेले मंदिर पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडते.
उजनी धरणाच्या बांधणीनंतर 1975 मध्ये जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली. यानंतर 24 वर्षांनंतर 2002 मध्ये मंदिर प्रथमच पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. यानंतर 2013, 2017, 2023 व 2024 मध्ये मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. यावेळी मंदिर पाहण्याचा हजारो पर्यटकांनी आनंद लुटला. अनेकांनी फोटोशुट करत मंदिर परिसरातील काठवणी कॅमेराबंद केल्या.
93 टक्के पाणीसाठा
सध्या उजनी धरणातील पाणी पातळी 93 टक्क्यांहून (113 टीएमसी) अधिक झाली आहे. तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक व नदीपात्रात सुमारे 10 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय सीना-माढा व दहिगांव योजना, बोगदा व मुख्य कालव्याचेही आवर्तन सुरु आहे. धरणात सुमारे 14 हजार 351 क्युसेकने पाण्याचा येवा सुरू असून, तेवढेच पाणी धरणातून पुढे सोडले जात आहे. पावसाचे आणखी काही महिने शिल्लक आहेत. यामुळे धरण शंभर टक्क्यांचा साठा ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.





