पुणे जिल्हा : ठाकरे गटाचा एकला चलोचा नारा?

आगामी निवडणुकीत स्वबळ की आघाडी याबाबत संभ्रम
संतोषनगर येथे आमदार काळे यांचा आभार मेळावा
राजगुरुनगर – विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी शिवसैनिकांची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जागा दिल्या नाही ही नाराजी असून येणा-या निवडणुक स्वबळावर की आघाडीत लढव्यात यामध्ये आज संभ्रम असला तरी योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे विजयी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी संतोषनगर येथे आभार मेळावा आयोजित केला होता. यावेळी गौतम चाबुकस्वार, रवी लांडगे, सुरेश भोर, अशोक खांडेभराड, सुधीर मुंगसे, रामदास धनवटे, संजय मोरे, दत्ता गांजळे, माऊली खंडागळे, अमोल पवार, संतोष डोळस यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक यांच्यासह तालुक्यातील महाविकस आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी बाबाजी काळे यांच्यावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका निवडणूका बॅलेट पेपरवर व्हाव्यात यासाठी आता लोकं प्रतिज्ञापत्र द्यायला तयार आहेत. दरम्यान, महायुतीला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी वेळ दिली नाही, असे असताना शपथविधीची तारीख सांगितली जातेय असा टोला त्यांनी महायुतीला टोला लगावला आहे.
तो निधी खेड तालुक्याला वापरू
खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे हे सत्तेत नसले तरी निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी आम्ही पक्षातील सर्व नेत्यांनी घेतली आहे. वेळप्रसंगी माझ्या वाट्याला आलेला निधी त्याचबरोबर खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा निधी या तालुक्यात वापरू; परंतु या तालुक्यात विकासकामे कमी पडू देणार नाही याची जबाबदारी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे, असे अहिर यांनी नमूद केले.
अन्यथा न्यायलयीन लढा उभारणार
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीवर अविश्वास ठेवला जातोय याचे निवडणूक आयोगाला निरसन करावे लागेल अन्यथा न्यायालयीन लढाईचा मार्ग अवलंबला जाईल. ईव्हीएमचे मालक निवडणूक आयोग ईव्हीएम हँक होऊ शकत नाही हे सांगत असले तरी ते हँक होऊ शकते हे दाखवणारे व्हिडीओ समोर येत असल्याने जनमतातुन शंका घेतली जातेय, असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी येत्या काळात संपूर्ण जिल्ह्यात जी-जी जबाबदारी पक्ष देईल ती संपूर्ण जबाबदारी पूर्ण करणार आहे.
– बाबाजी काळे, नवनिर्वाचित आमदार





