सासवड : मंदिरात दोन अतिरेकी शिरलेत… बॉम्ब ठेवलाय! सकाळच्या शांत वातावरणात हे वाक्य वार्यासारखे पसरले आणि क्षणात सासवड हादरले. सोपानदेव महाराजांच्या समाधी मंदिरात सुरू असलेल्या भाविकांच्या गर्दीत एकच खळबळ माजली. पोलिसांची धावपळ सुरू झाली, मंदिर रिकामे केले जाऊ लागले, आणि शहरभर भीतीची लाट पसरली. पण या घडामोडींमागचे सत्य जरा वेगळेच होते. हे होते एक थरारक मॉकड्रिल, म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी घेतलेली सराव कवायत! आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, हजारो भाविक सासवड शहरातून पालखीसोबत जातात. त्यात जर अचानक अशी आपत्ती उद्भवली, तर पोलीस यंत्रणा कशी प्रतिक्रिया देईल, याची कसोटीच घेतली जात होती. पण हा सराव इतका खर्यासारखा होता की, क्षणभरासाठी संपूर्ण शहरात भीतीचे सावट पसरले. सकाळीच मिळालेल्या मगोपनीय माहितीफनुसार मंदिरात दोन अतिरेकी लपून बसले आहेत आणि त्यांनी स्फोटके लावली आहेत, असा संदेश मिळताच सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी आपली टीम सक्रिय केली. अवघ्या काही मिनिटांत 15 पोलिसांचा बंदोबस्त मंदिर परिसरात दाखल झाला. भाविकांना शांतपणे बाहेर काढण्यात आले. दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतवादविरोधी पथक, क्युआरटी आणि ड्रोन युनिटला पाचारण करण्यात आले. संपूर्ण परिसर सील करण्यात आला. हवेत ड्रोन्स उडाले, जवानांनी बंदुका खांद्यावर घेतल्या आणि संशयास्पद पिशव्या शोधायला सुरुवात झाली. बेल्जियम जातीच्या वीरा या श्वानाने एका कोपर्यात जाऊन भुंकायला सुरुवात केली – आणि सार्यांचे लक्ष तिकडे वळले. त्या ठिकाणी ठेवलेली एक पिशवी संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. बॉम्बनाशक पथकाने तात्काळ ती पिशवी निष्क्रिय करत अतिरेकी हल्ला हाणून पाडला. बॉम्बशोधक व नाशक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे, प्रकाश पवार पोलीस हवालदार गणेश फापाळे सतीश गोजगे चंद्रशेखर मगर सहाय्यक फौजदार बाळासाहेब वाईकर राजू जठार ड्रोन पथक संदीप जगताप श्वान वीरा बेल्जियम तर गोपनीय विभागाचे रुपेश भगत, सुरज नगरे यांनी उपस्थित होते. या सार्या कृतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली – ती म्हणजे पोलिसांची सज्जता, कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता. जवानांनी प्रत्येक क्षणाला सजग राहून, कोणतीही घबराट न करता परिस्थिती नियंत्रणात आणली. हा मॉकड्रिल जरी काल्पनिक असला, तरी तो प्रत्यक्ष हल्ल्याचे खर्याखुरे चित्र उभे केले होते. वारीच्या सोहळ्यादरम्यान शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण राखण्यासाठी असे सराव उपयुक्त ठरणार आहेत. -ऋषिकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक, सासवड