पुणे जिल्हा : तात्यासाहेबांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे

कृषिरत्न अनिल मेहेर : पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
नारायणगाव – तात्यासाहेब भुजबळ कृषी शिक्षण संकुल ग्रामीण विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देणारी अग्रगण्य कृषी शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला येत असून त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे असल्याचे ग्रामोन्नती मत मंडळाचे कार्याध्यक्ष आणि कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी व्यक्त केले.
तात्यासाहेब भुजबळ यांच्या 49 व्या पुण्यतिथीच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात मेहेर बोलत होते. यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रविंद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, कृषी शिक्षण संकुलाचे प्रमुख रत्नदीप भरविरकर, देविदास भुजबळ, एकनाथ शेटे, तानाजी वारूळे, आल्हाद खैरे, ऋषिकेश मेहेर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, ग्रामोन्नती मंडळाचे सचिव दत्तात्रय गाडगे, डॉ. ए. बी. कुलकर्णी, एच. के. काळे, अनुराधा पुराणिक, एस. जे. खाडे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भीमराव भुजबळ, सचिन जुंद्रे, कुणाल भरविरकर वास्तुविशारद अरविंद ब्रह्मे, विविध शाखांचे विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, शिक्षक व शिक्षकेतर, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
मेहेर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी क्रांतीकारकांना राहण्यासाठी भुजबळांनी स्वतःच्या घरी व्यवस्था करून दिली होती. तसेच स्वातंत्र्यपूर्व लढ्यात भूमिगत चळवळीत सहभागी होऊन महत्त्वाची भूमिका बजावली. नारायणगाव आणि परिसरातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी ग्रामोन्नती मंडळ संस्थेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा होता. आपल्या भागातील मुलांना कृषी शिक्षण मिळावे यासाठी 1945 मध्ये शेतीशाळा सुरू केली.
स्वमालकीचा 16 एकरचा मळा संस्थेला विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी दान केला त्याच ठिकाणी आज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी शिक्षणाचे कोर्सेस सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पुण्यतिथिनिमित्ताने तात्यासाहेब भुजबळांच्या प्रतिमेची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी अहवाल वाचन, सूत्रसंचालन डॉ. सत्यवान थोरात यांनी तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलींद भुजबळ यांनी आभार मानले.





