पुणे जिल्हा : उन्हाळी बाजरी आली फुलोऱ्यात

आंबेगाव तालुक्यात आवर्तनाचा फायदा
अवसरी – आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे.सद्यःस्थितीत उन्हाळी बाजरी पीक फुलोऱ्यात आले असून, बाजरी पिकाचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजरीचे राखण सुरू केली आहे.
आंबेगाव तालुका हा पूर्वीच्या काळी बाजरी आणि बटाट्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. तालुक्यात असणारे डिंभे धरण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या कालव्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनामुळे आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात बारामाही पाण्याची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे तरकारी, नगदी, गुराचा चारा, अन्नधान्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
बारमाही पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी उन्हाळी बाजरी पीक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. पावसाळ्यात बाजरी पीक घेतले तर त्यापासून मिळणारे धान्य आणि वैरण याची प्रत पावसाने भिजल्याने खालावलेली असते. त्या प्रमाणात उन्हाळी पीक घेतले तर नुकसान होत नाही. म्हणून उन्हाळी बाजरी पीक घेण्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.
जनावरांना चारा म्हणून मका अणि स्वीटकॉर्न पीक जास्त प्रमाणात घेतले जात आहे. साडेतीन-चार महिन्यात बाजरी पीक तयार होत असल्याने धान्याची प्रत आणि वैरण ही चांगली मिळते, त्यामुळे तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते. सद्यःस्थितीत बाजरीचे पीक फुलोऱ्यात असून अंतिम टप्प्यात आले आहे.
पक्ष्यांपासून बाजरी पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रंगीबेरंगी प्लॅस्टिक पट्ट्या लावून पाखरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पक्ष्यांनी धान्य खाऊ नये म्हणून राखण करताना शेतकरी दिसत आहे, तसेच डबे वाजवून पाखरे हुसकण्याचा प्रयत्न करत आहे.
तरकारीवरही भर
गेल्या दोन-तीन वर्षात करोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर, गावोगावी, गल्लोगल्ली, तसेच हातगाडीवर पालेभाज्या विकणाऱ्या विक्रेत्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी तरकारी पिकाच्या लागवडीकडेही लक्ष देत आहेत. कमी वेळात जास्त पैसे मिळत असल्याने तालुक्यात गवार, मिरची, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर अशा नगदी पिकाचा क्षेत्रात वाढ झाली आहे.





