रांजणगाव गणपती : शिरूर व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसतोडीबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वप्निल गायकवाड यांनी दिली. गायकवाड म्हणाले, शिरूर आणि हवेली तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांना ऊसतोडीबाबत मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. अनेक शेतकरी वेळेत ऊसतोडणीची मागणी करतात. मात्र, काही कारखान्यांकडून जाणीवपूर्वक ऊसतोड दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून थेट शेजारच्या कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे. याबाबत प्रत्येक कारखान्याच्या प्रशासनाशी थेट भेटून पत्रव्यवहार केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील निर्देश दिले आहेत. मलठण येथील पराग साखर कारखाना, दौड शुगर, अंबालिका शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा या कारखान्यांना भेट देऊन ऊसतोडीसंदर्भात नियोजन करण्याबाबत निवेदन दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. शिरूर, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी आहे. परंतु, ऊस तोडण्यासाठी कारखान्याकडे वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील निवडणूक प्रचाराच्या भाषणांमध्ये या भागातील ऊस शिल्लक राहणार नसल्याचे सांगितले आहे. ऊस लवकर गेल्यानंतर शेतकऱ्यांना कांदा लागवडी करता येतात. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपला ऊस लवकर तोडून नेण्यासाठी प्रयत्न करतात. हवेलीमधील थेऊर कारखाना व शिरूर तालुक्यातील घोडगंगा कारखाना बंद असल्यामुळे या तालुक्यातील ऊस इतर कारखान्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून शिरूर हवेलीतील शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.