Pune District : ऊस पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव

शेतकर्यांची वर्षभराची मेहनत नष्ट ः अळ्या मुळांना खात पिके वाळली
वाल्हे – बदलत्या हवामानाने महाराष्ट्रातील शेतकर्यांना पुन्हा एकदा वेदनादायक झटका दिला आहे. पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावात ऊस पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव इतक्या प्रमाणात वाढला की शेतकर्यांची वर्षभराची मेहनत, कर्जातून घेतलेली लागवड, आणि त्यांच्या कुटुंबाच्या जगण्याच्या आशा एका क्षणात उद्ध्वस्त झाल्या आहेत.
मागील दोन महिन्यांपासून पिकांवर हुमणी अळीची वाढती हल्लाबोल सुरू झाली आहे. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, या अळ्या पिकांच्या मुळांना खात असल्याने पिके वाळली, पाने पिवळी पडली, आणि पीक पूर्णपणे नष्ट होऊ लागले आहे. प्रगतशील शेतकरी विक्रमसिंह भोसले यांनी सांगितले, चार एकर ऊसाचे पीक एका क्षणात वाळून गेले. आता फक्त पिकांचा नाही, तर कर्जाची चिंता आणि घरचा खर्च कसा चालवायचा, हे मोठं प्रश्न बनलं आहे.
हुमणी अळी मुळांवर पोहोचल्याने वरून केलेल्या फवारणीचा काही उपयोग होत नाही. शेतकर्यांनी लाखो रुपये खर्च करून बियाणे, खत, मजुरी आणि पाणी यांचा उपयोग करून उभे केलेले पीक आता उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पुनर्लागवड करावी लागणार, आणि या सगळ्या खर्चामुळे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
वाल्हे व आसपासच्या गावांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांचे 30 ते 80 टक्के नुकसान होत आहे. पावसाची अनियमितता आणि वाढती उष्णता यामुळे अळीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सूनपूर्व जोरदार पावसामुळे अळीचा काहीसा नायनाट झाला होता; पण नंतर पुन्हा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आणि अळीला पुनः वाढीसाठी संधी मिळाली.
या आर्थिक संकटामुळे शेतकरी मानसिक ताणात आहेत. त्यांच्या चेहर्यावर चिंता, नैराश्य आणि भयाचे भाव स्पष्ट दिसतात. वर्षभराची मेहनत, कर्जातून घेतलेले बियाणे आणि खत, आणि शेतात ज्या पिकांच्या नशिबाची वाट पाहत होते, ती सर्व एका क्षणात नष्ट झाली आहे. वाल्हे गावातील शेतकरी म्हणतात, जगायचं कसं? पिकं वाचवण्यासाठी उपाय आहेत, पण त्यासाठी खर्च मोठा लागतो. सरकारने मदतीसाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत, नाहीतर शेतकर्यांची उपासमारीही होऊ शकते. या परिस्थितीत शेतकरी वर्गाला अर्थसाहाय्य आणि तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे. नाहीतर, त्यांच्या हातातील मेहनत, कुटुंबाचा उपजीविका, आणि गावाची शेतकरी संस्कृती यावर मोठा परिणाम होईल.
हुमणी अळीचे तातडीने नियंत्रण करणे गरजेचे आहे. रासायनिक आणि जैविक किडनाशकांचा समन्वित वापर केल्याशिवाय शेतकर्यांचे नुकसान थांबवता येणार नाही. त्यांनी शेतकर्यांनी कृषि विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी.
-संतोष जायपत्रे, सहाय्यक कृषी अधिकारी
या उपाययोजना आवश्यक
रासायनिक किडनियंत्रण: इमिडाक्लोप्रिड 40%, फिप्रोनिल 40%, डेल्टामेथ्रिन 11 ु/ु अशा औषधांचा वापर वाफसावधीत करणे. जैविक किडनियंत्रण: बी. व्ही. एम. (बिव्हेरिया ब्यासियांना) व इ. पी. एन. (व्हि. एस. आय निर्मित) वापरून 7-10 दिवसांच्या अंतराने आळवणी करणे.





