पुणे जिल्हा : वीजतारांच्या घर्षणाने लौकी येथे ऊस जळाला

मंचर : लौकी (ता. आंबेगाव) येथील मधला मळा परिसरातील १२ शेतकऱ्यांचा एकूण सहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. वीजवाहक तारांचे घर्षण होऊन ऊस जळाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. महावितरण विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.
लौकी (ता.आंबेगाव) येथे मधला मळ्यात शंकर कोंडाजी थोरात यांच्या उसाच्या शेतातून महावितरणच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. तारांमध्ये घर्षण होऊन आग लागल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. काही वेळातच रूपेश विजय थोरात, दुलाजी कोंडाजी थोरात, भागाजी कोंडाजी थोरात, शोभा राजाराम थोरात,श्रीकांत देवराम थोरात,
कविता बाबाजी थोरात, दगडू नामदेव थोरात, राहुल शांताराम थोरात, सुभाष किसन थोरात, रामचंद्र गणपत थोरात, सुमन रामचंद्र थोरात, संतोष नंदाराम थोरात आदी शेतकऱ्यांचा उसाला आग लागली.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महागाईच्या काळात हातातोंडाशी आलेला परिपक्व ऊस जळाल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून महावितरण विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,
अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे. ऊस जळून गेल्याने वजनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. महावितरण कंपनीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ही करण्यात आली आहे.





