Pune District : चिंबळीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती

चिंबळी : स्ट्रॉबेरीची एक नव्हे तर तीन-तीन प्रकारच्या वाणांचे उत्पादन घेणार्या चिंबळी येथील जाधव दाम्पत्याच्या शेतातील स्ट्रॉबेरीची खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना देखील भुरळ पडली असून त्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत शेतकर्याच्या शेत बांधावर जात स्ट्रॉबेरी उत्पादनाची माहिती व आस्वाद घेतला.
चिंबळी येथील प्रयोगशील महिला शेतकरी सीमा चंद्रकांत जाधव यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीच्या तीन पद्धतींची लागवड केली आहे. यात मिलिशा, एम.टू व स्वीट सनशेशन या जातींचा समावेश आहे. कमी जागेत उकृष्ट व चविष्ट स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत असल्याने जाधव यांच्या मिलिशा या स्ट्रॉबेरीला चांगली मागणी आहे.
त्यांच्या या उत्पादनाची माहिती तहसीलदार देवरे यांना समजताच त्यांनी हा प्रकल्प स्वतः पाहण्याचे ठरवले. आपल्या कामाच्या दिनक्रमातून आवर्जून वेळ काढत त्यांनी जाधव यांच्या शेताला भेट दिली. येथील स्ट्रॉबेरीची लागवड, उत्पादन व विक्री याची त्यांनी माहिती जाणून घेतली. जाधव आपल्या शेतात विदेशी भाज्यांचा देखील प्रयोग करतात. विदेशी भाजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रोकली या भाजीची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी कृषिरत्न पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी सीमा जाधव, चंद्रकांत जाधव, ओंकार जाधव, प्रतीक जाधव, प्रणव जाधव व इतर अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
विदेशी भाज्या, रानभाज्या, स्ट्रॉबेरी उत्पादनाचे सुंदर काम सीमा जाधव आपल्या शेतात करत आहेत. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न कसे मिळवायचे हे शिकण्यासाठी अल्पभूधारक शेतकर्यांनी जाधव यांच्या शेतीला अवश्य भेट दिली पाहिजे.
– ज्योती देवरे, तहसीलदार, खेड





