Pune District : आदिवासींनी पिकवलेली स्ट्राॅबेरी बनली विद्यार्थ्यांचा आहार

मंचर : आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्राॅबेरी आदिवासी विकास विभागाने विकत घेवून आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना रोजच्या आहारात दिली आहे. घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी पुढाकार घेवून हा अभिनव कार्यक्रम सुरू केल्याने आदिवासी शेतकऱ्र्यांनी कौतुक केले.
आदिवासी विकास विभागाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ५५ शेतकऱ्यांना स्टॉबेरी लागवडीसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले आहे. यातून शेतकऱ्यांनी संपूर्ण संद्रिय स्ट्राॅबेरी पिकवली आहे. ही पिकवलेली स्ट्राॅबेरी शेतकरी भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विकतात किंवा पुणे शहरासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवत आहेत. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना ही स्ट्राॅबेरी आपण खरेदी करून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आहारात रोज खायला देवू. अशी कल्पना सूचली.
त्यांनी स्टॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कळवून घोडेगाव येथे सुरू असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाक गृहात आपण पिकवलेली स्ट्राॅबेरी आणून द्या, याठिकाणी वजन करून लगेच पैसे घेवून जा, असे आवाहन केले.याला बोरघर परिसरात शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला व पहिल्याच दिवशी २५ किलो स्ट्राॅबेरी जमा झाली. घोडेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाक गृहात वजन करून २३० रूपये किलोप्रमाणे त्यांना पैसे देण्यात आले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकरी सोनुल कोतवाल, अधीक्षक विपुल टकले, समाजसेविका जनाबाई उगले हे उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा
आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्राॅबेरी आदिवासी विद्यार्थ्यांना खायला जात असल्याचा आनंद होत आहे, शेतकरी देखिल याला चांगला प्रतिसाद देत आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घेवून ही योजना सुरू करायला लावली व याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे, पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी सांगितले.
कोणतेही औषध, खत न मारता संपुर्ण सेंद्रिय पध्दतीने पिकवलेली स्ट्राॅबेरी आज आमच्याच विद्यार्थ्यांना खायला मिळत आहे. याचा मनापासून आनंद होतोय. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी पुढाकार घेवून सुरू केलेली योजना खरोखरच कल्याणकारी आहे.
-संतोष शेळके, स्टॉबेरी उत्पादक शेतकरी.





