Pune District : अवजड वाहतूक बंद करा, अन्यथा एमआयडीसी बंद करू

शरद बुट्टे पाटील : आंबेठाण येथील बैठकीत नागरिकांचा आक्रमक पवित्रा
शिंदे वासुली – शिंदे, वासुली, वराळे, भांबोली आणि आंबेठाण या पंचक्रोशीतील गावांमधील नागरिक वाहतूककोंडीच्या समस्येने हैराण झाले असून अखेर त्यांच्या संयमाचा बांध शनिवारी (दि. 12) फुटला आहे. या गावांमधून अवजड वाहतूक बंद करा, अन्यथा आम्ही एमआयडीसी बंद करू, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिला आहे.
शिंदे, वासुली, वराळे, भांबोली आणि आंबेठाण या पंचक्रोशीतील गावांमध्ये वाढत्या वाहतूकोंडीच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची शनिवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण, आणि अवजड वाहनांची सततची वर्दळ यावर पोलीस अधिकार्यांसमोर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
याच नाराजीचे निवेदन शरद बुट्टे पाटील यांनी पोलीस अधिकार्यांना देत कडक शब्दांत प्रशासनाविरोधात भूमिका मांडली आहे. बैठकीला महाळुंगे इंगळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, वाहतूक पोलीस निरीक्षक चव्हाण, अमोल पानमंद, दिनेश मोहिते, भांबोलीचे सरपंच काळुराम पिंजण, बोरदरचे सरपंच दत्तात्रेय पडवळ, माजी सरपंच अशोक मांडेकर, दिलीप वाळके, गोविंद घाटे, दिनेश लांडगे, अॅड. बाळासाहेब लिंभोरेे, बाबाजी पडवळ यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की…
अवजड वाहनांच्या रस्त्यावरून सततच्या वर्दळीमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. वसुली फाटा ते चाकण या 10 किमी अंतरासाठी वाहनांना 3 तास लागतात. मुलांच्या शिक्षणाचा वेळ जातो, अपघात वाढले आहेत. एमआयडीसीमुळे जेवढे नागरीकरण झाले आहे, त्यामध्ये कचरा व्यवस्थापन, पाणी टंचाई, रस्ते या सर्व समस्या गंभीर झाल्या आहेत. फक्त ग्रामपंचायतींकडे बोट दाखवणे योग्य नाही, एमआयडीसीला देखील जबाबदारी घ्यावीच लागेल.





