Pune District : चाकण एमआयडीसीतील गुन्हेगारीला आळा घाला

महाळुंगे इंगळे पोलिसांना संतोषनाना डोळस यांचे निवेदन
राजगुरूनगर – जागतिक हब असलेल्या चाकण एमआयडीसी वाढलेली गुन्हेगारीवर तात्काळ आळा घालावा अशी मागणी रिपाइं (आठवले)श्रमिक ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष संतोषनाना डोळस यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांना डोळस यांनी समक्ष भेट घेऊन दिले.
चाकण येथील एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून उद्योजकांना त्रास दिला जात आहे. अनेक टोळ्या यासाठी सक्रिय आहेत. स्क्रॅप ठेका कामगार ठेका मिळवण्यासाठी चढाओढ लागली असून यासाठी गुंडाच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनास धमकावण्यात येत आहे. त्यातून अनेकदा हाणामार्या अपहरण दोन गटातील वाद उफाळून आले आहे.
जगातील नामांकित कंपन्यांमधिल विविध प्रकारच्या ठेकेदारीसाठी अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून हाणामारी, खून, दरोडे, चोरीचे प्रकार येथे घडलेले आहेत अशा परिस्थितीत या टोळीतील सक्रिय गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
एमआयडीसीमध्ये अशा सराईत गुन्हेगारी टोळक्यांवर कडक कारवाई करून त्यांना आवर घालण्यात यावा अन्यथा रिपाइं (आठवले) श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जाहीर अंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाइं(आठवले)श्रमिक ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.





