पुणे जिल्हा : रसवंतीगृहांकडे पावले वळू लागली

भवानीनगर – सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रस्त्यालगत जागोजागी रसवंतीगृह निर्माण झाले असून कडक उन्हामध्ये थोडी विश्रांती घेत शरीराला थंड करण्यासाठी उसाचा रस घेण्याकडे नागरिकांचा ओघ वाढला आहे.
जानेवारी महिन्यापासूनच उन्हाळा सुरू झाला; परंतु फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने सध्या नागरिकांना भर दुपारी घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. दैनंदिन कामे करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला उन्हाळा असला तरी देखील घराबाहेर पडावे लागत आहे. बारामती इंदापूर हा रस्ता सध्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
याच रस्त्यालगत काटेवाडी ते भवानीनगर या परिसरामध्ये रसवंतीगृह सुरू करण्यात आले आहेत. भर उन्हात प्रवास करून थकलेल्या प्रवाशांना शरीराला विश्रांती मिळावी या उद्देशाने तसेच शरीराला थंडावा निर्माण व्हावा, यामुळे या रस्त्यालगत असणार्या रसवंतीगृहामध्ये सध्या उसाचा रस घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे.
यावेळी काटेवाडी येथील रसवंती गृह चालवणारे सचिन शिंदे यांच्याशी विचारणा केली असता शिंदे यांनी सांगितले की, यावर्षी उन्हाळा कडक असल्याने उसाचा रस घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ होत आहे. दिवसाकाठी चार हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे; परंतु याहीपेक्षा जास्त व्यवसाय उसाच्या रसापासून झाला असता मात्र या रस्त्यालगत अनेक ठिकाणी रसवंतीगृह सुरू झाले असल्याने व्यवसाय हा कमी जास्त प्रमाणात होत आहे. तरीदेखील वातावरण तापल्याने व उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने उसाच्या रसाच्या माध्यमातून रसवंती गृहाचा व्यवसाय चांगल्या प्रमाणात होत आहे.





