पुणे जिल्हा : रांजणगाव परिसरात कांदा काढणीला वेग

बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यामध्ये सध्या पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे व कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरुवात केली आहे.
वाघाळे परिसरात सध्या पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे व कांदा पीक जळून जाऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील दोन अडीच महिन्याचा कांदा विक्रीसाठी काढला आहे. सरासरी एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आलेल्या या कांदा पिकातून शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभराचे आर्थिक गणित जुळवायचे असते.
त्यामुळे कांदा पिकाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा. चासकमान कालव्याला लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी अपेक्षा महिला शेतकरी रूपाली राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केली आहे.
सध्या रांजणगाव परिसरातील वाघाळे पिंपरी दुमाला, खंडाळे, गणेगाव खालसा, वरुडे, शिंगाडवाडी, कोंढापुरी, बुरुंजवाडी, सोनी सांगवी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा काढणी सुरू आहे.
मात्र, चासकमान व डिंभा कालव्याला पाणी सोडले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कालावधीच्या आधीच कांदा काढणी सुरु केली आहे. त्यामुळे चासकमान व डिंभा चा-यांना लवकरात-लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून समोर येऊ लागली आहे.





