Pune District : पिंपळे जगतापच्या रस्त्यावर अखेर रब्लर गतिरोधक

शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे शिक्रापूर चाकण रस्त्यावर (दि.६) शाळेमध्ये मुलाला सोडायला चाललेल्या युवकासह त्याच्या दोन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर शिरुर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देताच येथील रस्त्यावर रब्लर बसवण्यात आले आहे.
पिंपळे जगताप येथे अपघातात गणेश खेडकर यांसह त्याच्या दोन बालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्याच्या सुधारणेसाठी रास्तारोको आंदोलन केले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी बांधकाम विभागाला योग्य सूचना दिल्या.
माजी आमदार पवार यांनी काही पदाधिकाऱ्यांसह खेडकर कुटुंबीयांची भेट घेत ग्रामस्थांशी चर्चा करीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन रस्त्यावर तातडीने गतिरोधक तसेच दिशादर्शक व अपघातग्रस्त इशारा फलक लावण्याच्या सूचना दिल्या.
अखेर बांधकाम विभागाने रस्त्यावर पांढरे रब्लर गतिरोधक बसवण्यास सुरुवात केली. माजी आमदार पवार व पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.





