पोलीस अधीक्षक गिल्ल : रांजणगावात पोलीस पाटलांसाठी खास बैठिक रांजणगाव गणपती – खंडाळे व रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटून गेले तरीही आरोपी सापडत नसल्यामुळे या आरोपीच्या तपासासाठी विशेष पोलीस पथकाचे नियोजन करण्यात आले असल्याची घोषणा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी केली. रांजणगाव गणपती येथील पोलीस पाटलांसाठी आयोजित बैठकीत संदीपसिंह गिल्ल बोलत होते. ते म्हणाले की, पोलीस पाटील हे पोलिसांचे नाक व डोळे आहेत.पोलीस पाटलांनी मांडलेल्या समस्यांवर लवकरात लवकर उपायोजना केल्या जातील, त्याचबरोबर शाळा व विद्यालयबाहेर फिरणार्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी तत्पर राहणार तसेच अनोळखी व संशयित व्यक्तीची पोलिसांना माहिती द्यावी, एक गाव एक अंमलदार प्रमाणे काम झाले पाहिजे, अंमलदाराने आठवड्यातून एकदा गावाला भेट दिली पाहिजे. पोलीस पाटलांनी गावातील माहिती महिन्यातून एकदा अधिकार्यांना दिली पाहिजे, रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांचा व कुटुंबाचा सहभाग गरजेचा आहे. मुलीना स्व स्वारक्षणा चे धडे दिले पाहिजे, तरुण मुलांनी, सायबर क्राईम कडून बचाव होण्यासाठी सजग राहिले पाहिजे, ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत करणे व सर्व ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना ही गिल्ल यांनी यावेळी दिल्या. केंदूर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याशिवाय घराची नोंद करणार नसल्याचा ठरव ग्रामसभेत घेतला आहे. जातेगाव बुद्रुक येथे मुलींसाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले जात आहे, या दोन्ही उपक्रमांचे गिल्ल यांनी कौतुक केले. पोलीस पाटलांनी मांडलेल्या समस्या * मोटार चोरीचे प्रमाण वाढलेले आहे * बिबट्याचा वावर वाढला आहे * बेट भागात वाढलेले अवैद्य धर्मांतरण * शिरूरच्या पूर्व भागात गुर्हाळामुळे परप्रांतीयांचे वाढले * चाकण शिक्रापूर रस्त्यावर वाढलेले अपघाताचे प्रमाण * पुणे आहिल्या नगर-महामार्गावरील वाढलेली वाहतूककोंडी भाडे कराराचे अॅप तयार करणार सध्या पुणे नगर महामार्गावरील सर्वच गावांच्या लोकसंख्या या पाच ते सहा पट वाढल्याने व कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये भाडेकरूंची अद्यावत माहिती उपलब्ध नसल्याने आरोपी शोधणे पोलिसांना जिकरीचे होऊन बसले आहे. त्यामुळे भाडे कराराचे अॅप तयार करण्यात येणार आहे. बाहेरून आलेल्या माणसाची माहिती देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या भाडेकरुंची कागदपत्रे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत यांना देणे घरमालकांना बंधनकारक करण्यात येणार आहे, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्पष्ट केले.