Pune District : सोयाबीन 48 रुपये 92 पैसे किलो

राजगुरूनगर : खेड तालुका खरेदी- विक्री संघाच्या देखरेखीखाली सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून 48 रुपये 92 पैसे प्रतिकिलो प्रमाणे खरेदी होत आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापक प्रतापनाना टाकळकर, संघाचे उपाध्यक्ष नामदेव कलवडे यांनी दिली.
यंदा खेड तालुक्यात उंच्चाकी खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन निघाले; मात्र प्रतिकिलोचा बाजारभाव कोसळल्याने 50 रुपये किलोच्या आत हा बाजारभाव स्थिर राहिल्याने उत्पादक शेतकरी वर्गात नाराजी पसरली होती.
ऐन विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने नाफेड मार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेऊन शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पडताळणी करुन खरेदी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील खरेदी विक्री संघ म्हणून एजन्सी नेमली असली तरी नाफेड मार्फत ही सोयाबीनची खरेदी केली जात आहे.
खरेदी करण्यात आलेले सोयाबीन हे रांजणगाव शासकीय गोदामात साठवले जात आहे. येथे खरेदी केलेले सोयाबीन शासकीय गोदामात पोहोच होताच शेतकरीनिहाय यादी आणि झालेली रक्कम संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट जमा होत आहे.
दरम्यान सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंद असून ज्या शेतकर्यांनी आँंनलाईन नोंदणी यापूर्वी केली आहे, अशा सोयाबीन उत्पादक शेतक-यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात येत असल्याची माहिती संघाचे लिपिक भास्कर जगदाळे यांनी दिली.





