पावसाने मारली दडी : बळीराजा हवलदिल राजुरी – मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीचा शेतकर्यांना सामना करावा लागला. तर यंदा पावसाळा सुरू होऊन महिना झाला.तरी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना पेरणीयोग्य पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. आज ना उद्या पाऊस पडेल या आशेवर शेतकरीराजा असून वरुणराजा त्यांना हुलकावणी देत आहेत. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत शेतकर्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेे. जनावरांच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर पायपीट करत तसेच काही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांच्या चार्यासाठी वणवण भटकंती करत बाहेरील गावांवरून चारा आणावा लागत होता. अजूनही याच परिसरातील काही गावांना अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून या परिसरात शेतकर्यांसह नागरिकांना मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जमिनीची मशागत करून सध्या या परिसरात 35 ते 40 टक्के पेरण्या झाले असून उर्वरित 60 ते 65 टक्के पेरण्या बाकी आहेत.त्यामुळे काही जमिनी मशागत करून अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. दुबारपेरणीची भीती जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे, राजुरी, अणे, बोरी, जाधववाडी, साकोरी, रानमळा, मंगरूळ, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी, उंचखडक या भागातील काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. तर काही ठिकाणी अजूनही पेरण्यासाठी योग्य पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकर्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या त्या पिकांना पाण्याची गरज भासत असून पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांना उभे राहून शकते त्यामुळे त्या परिसरातील शेतकर्यांची चिंता वाढली आहे.