पुणे जिल्हा : पुरंदरच्या दक्षिण भागात पेरणीची लगबग

पेरणीयोग्य पाऊस झाल्याने जमिनीत वाफसा तयार
परिंचे -पुरंदरच्या दक्षिण भागात पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीत चांगला वाफसा झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामाची लगबग सुरू आहे. बाजरी, सोयाबीन, भुईमूग तसेच कडधान्याची पेरणी सुरू करण्यात आली आहे. 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या ओलीवर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या पिकांची काही प्रमाणात उगवण कमी झाली असल्याचे शेतकरी अशोक जाधव यांनी सांगितले आहे. चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा फायदा चांगली उगवण झालेल्या पिकांना होणार आहे.
राज्यात पावसाचा हाहाकार असला तरी पुरंदरच्या दक्षिण भागात मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. मान्सून पूर्व पाऊस कमी झाल्याने नांगरणी करून ठेवलेल्या शेतात पूर्व मशागतीची कामे खोळंबली होती या वर्षींचा हंगाम जवळपास वाया जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाट असताना गेल्या आठ दिवसांत मान्सूने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करून पेरणीला सुरुवात केली असल्याचे शेतकरी अशोक बनकर व अमीत बनकर यांनी सांगितले.
वरंभा पद्धतीचा वापर
ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी कराण्याकडे शेतकऱ्यांचा कल असून पेरणीबरोबर रासायनिक खतांची मात्रा देण्याची व्यवस्था आहे. वरंभा पद्धतीने सारे पाडून पेरणी, कुळवणी एकाचवेळी करता येत असून कमी वेळेत, कमी खर्चात ही पेरणी केली जात असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करायला पसंती देत आहेत.
पारंपरिक पद्धतीने साठवून ठेवलेले…
घरगुती पातळीवर चुलीतील राखेमध्ये पारंपरिक पद्धतीने साठवून ठेवलेले कडधान्य बियाणे काढून स्वच्छ करून पेरणीसाठी वापरली जात असून सोयाबीन, भुईमूग व बाजरी बियाण्यांच्या सुधारीत वाणाची खरेदी केली असल्याचे शेतकरी अशोक बनकर यांनी सांगितले.
…म्हणून बैलांच्या सहाय्याने पेरणी
बैलांच्या साह्याने पेरणी करत असताना बी जास्त खोल जात नसल्याने उगवण क्षमता लवकर व चांगली होत असल्याचे बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले.
पाऊस उशिरा सुरू झाल्याने तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने फक्त बाजरीची पेरणी केली असून पावसाचे प्रमाण कमी वाटल्यास ज्वारी व हरभरा पेरणी लवकर करून मिळेल तेवढे पिकाचे उत्पन्न पदरात पाडून घ्यावे लागणार आहे.
– मनोज शिवरकर, शेतकरी





