पुणे जिल्हा : वाफसा आल्यानंतर बाजरीची पेरणी

पूर्व हवेलीत शेतकरी आशावादी
लोणी काळभोर – प्रचंड उष्णता व पाणी टंचाईने हैराण होऊन पावसाची वाट पाहत असलेल्या हवेली तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. शेतकरी सुखावला आहे. शनिवार (दि.८) संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे वातावरण थंडगार झाले आहे. दोन तीन टप्प्यात झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झालेले नाही. पूर्व हवेलीत शेतकरी घरी खाण्यासाठी बाजरीचे पीक केले जाते. वाफसा आल्यानंतर शेतकरी बाजरीची पेरणी करणार आहेत.
महाराष्ट्रातील इतर तालुक्यां प्रमाणेच हवेली तालुक्यात यंदा अतिशय कडक उन्हाळा होता. गेल्या दहा वीस वर्षांपासून मे महिन्यात वळवाचा पाऊस अजिबात पडत नाही. नवा मुठा उजवा कालवाही बंद झाल्याने शेतकऱ्यां बरोबरच सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आगामी काळ कसा जाईल याची काळजी लागली होती. पुणे जिल्ह्य़ाच्या इतर तालुक्यात चांगला पाऊस पडल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु हवेली तालुक्यात मात्र पाऊस पडत नव्हता.
शनिवारी संध्याकाळी लोणी काळभोर, उरूळी कांचन या पट्टय़ात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. असाच जोरदार पाऊस खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर हि चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यास नवीन मुठा उजव्या कालव्याला ही पाणी येऊन हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील तब्बल सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला पाणी मिळणे सुलभ होईल. त्यामुळे या पावसामुळे सर्व शेतकरी खुश झाले आहेत. आज झालेल्या पावसामुळे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद शेतकरी वर्गात पसरला आहे.





