Pune District : सततच्या पावसामुळे आंबेगावच्या पूर्व भागात पेरण्या रखडल्या

पेठ – सातगाव पठारावर सततच्या पावसाचा फटका हा शेतीला बसताना दिसून येत आहे. मागील महिन्याच्या मेमधील २० तारखेपासून चालू झालेला पाऊस अजून पर्यंत थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे शेतात पेरणी व बटाटा लागवड रखडली, तणवाढीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.
सातगाव पठार भागात गेले महिनाभर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेती कामांवर मोठा परिणाम झाला आहे. अवकाळी आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शेतकरी अजूनही पेरणीसाठी पूर्णपणे शेतात उतरू शकलेले नाहीत. विशेषतः बटाटा लागवड ही वेळेवर पूर्ण होणारी प्रक्रिया असून ती रखडल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतात सतत ओलसरता राहिल्याने तणवाढ झपाट्याने होत असून, पीक न लावता तण नियंत्रणासाठीच शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे. शेतामध्ये तणनाशक फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला असून उत्पन्नाबाबत अनिश्चितता वाढली आहे.
या परिस्थितीत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, तसेच तातडीने मदतीची योजना राबवावी महिनाभर बटाटा बियाणे अनेक शेतकऱ्यांनी घरात आणून ठेवलेले आहे. पण पावसामुळे लावता येत नाही. त्यामुळे बटाटा बेणे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, चालू वर्षी जवळपास ४० टक्के बटाटा लागवड कमी होण्याची शक्यता आहे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
जर पुढील काही दिवसांत हवामान सुधारले नाही, तर खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती कारेगावमधील प्रगतिशील शेतकरी जयसिंग घेवडे पेठमधील बाळासाहेब ज्ञानेश्वर धुमाळ(कवी) यांनी व्यक्त केली आहे.
पाऊस काही थांबत नाही. शेतात पाणीच पाणी आहे. बियाणे खराब होईल, या भीतीने शेतकरी पेरणी करत नाही. पण तण मात्र मोठ्या प्रमाणावर वाढलेत.आम्ही तणनाशक फवारतोय, पण त्यातही खर्च वाढतोय.
– संजय कराळे, प्रगतिशील शेतकरी, कारेगाव.





